नागपूर : उपराजधानीत गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत सुरू असलेली धुसफूस गुरुवारी ईडीच्या विरोधातील आंदोलनाच्या निमित्ताने समोर आली. जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुखांनी वेगवेगळय़ा ठिकाणी आंदोलन केले.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात तसेच किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेनेच्यावतीने गुरुवारी शहरात आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी एक वाजता संविधान चौकात आंदोलन करण्याचे ठरवले होते. तशी सूचनाही शिवसैनिकांना देण्यात आली. दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख नितीन तिवारी यांनी संविधान चौकातच पाच वाजता आंदोलन करण्याचे ठरवले. त्यामुळे कोणाच्या आंदोलनात जायचे असा संभ्रम शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला होता. गटबाजीचा शिक्का लागू नये म्हणून काही शिवसैनिक दोन्ही आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र एकाच दिवशी दोन आंदोलनामुळे शिवसैनिकांची दमछाक झाली.

शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यशैलीवर जुने शिवसैनिक नाराज होते. त्यामुळे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांना जिल्हा प्रमुख केले. यामुळे शिवसेनेते जुन्या-नव्यांचा समन्वय साधाला जाईल अशी अपेक्षा  होती दोन  आंदोलनामुळे फोल ठरली.

मुंबईतून आंदोलनाचे आदेश आल्यानंतर जिल्हा प्रमुख आणि शहरप्रमुखांनी एकत्रित आंदोलनाची रुपरेषा ठरवणे अपेक्षित होते. संपर्क प्रमुख या नात्याने दुष्यंत चतुर्वेदी यांनीसुद्धा पुढाकार घेतला नाही. जिल्हा आणि शहर प्रमुख्यांनी एकमेकांसोबत संपर्क साधला नाही. आपापल्या अधिकारात आंदोलनाच्या वेळा निश्चित केल्या. त्यामुळे जिल्हा प्रमुख कुमेरियांचे आंदोलन दुपारी एक वाजता तर शहर प्रमुख नितीन तिवारी यांचे आंदोलन सायंकाळी पाच वाजता झाले. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली. यात शिवसैनिकांची मात्र पंचाईत झाली.