नागपूर: अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात पुढील तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी हाय अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीसह पावसाळ्यातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी आपत्कालिन नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनाची माहिती आपण कानून घेऊ या.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी राज्यातील वीजपुरवठ्याचा आढावा घेतला. नैसर्गिक आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, मुख्यालय व परिमंडलस्तरावर चोवीस तास आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाची लगेचच स्थापना करावी. कोणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिले. व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीमध्ये संचालक (संचालन) सचिन तालेवार यांच्यासह राज्यातील मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते उपस्थित होते.
यंदा मान्सूनच्या आगमनापूर्वीच राज्यात वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची दररोज हजेरी सुरू आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र सध्या स्थिर असले तरी त्याच्या प्रभावामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीमध्ये सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांसाठी ही बैठक झाली. दरम्यान, या काळात मुख्यालय व राज्यातील आपत्कालिन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे.
लोकेश चंद्र पुढे म्हणाले की, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने व वेळेत सुरू करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. एखाद्या ठिकाणी दुरुस्ती कामाला वेळ लागणार असेल तर त्याबाबत संबंधित ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे, व्हॉटस् अॅप ग्रुप्स, ट्वीटर व सोशल मिडिया, प्रसिद्धी माध्यमांद्वारे ताबडतोब कळविण्यात यावे. खंडित वीजपुरवठ्याच्या कालावधीबाबत मुख्यालयाकडून पर्यवेक्षण करण्यात येत आहे. शक्य असूनही वीजपुरवठा वेळेत सुरू झाला नाही, तर त्याची गंभीर दखल घेण्यात येईल. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी क्षेत्रीय वरिष्ठ अभियंत्यांनी मोठ्या व गंभीर बिघाडाच्या ठिकाणी स्वतः जाऊन दुरूस्ती कामांना वेग द्यावा. तसेच महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे स्पष्ट निर्देश चंद्र यांनी दिले.
वादळवारा व मुसळधार पावसामुळे वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईलसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी. पावसामुळे नादुरुस्त झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी संबंधित अभियंते, कर्मचाऱ्यांना तसेच सर्व एजन्सींना मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहण्याची सूचना चंद्र यांनी केली. या पद्धतीने मान्सूनच्या आगमनानंतर पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरणच्या यंत्रणेने सज्ज राहावे असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच काम करत असताना सुरक्षा संबंधी सर्वोतोपरी काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले.