नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वन्यजीवांच्या यादीत वाघांच्या बरोबरीने सारस पक्षीही आहेत. मात्र, वाघाच्या संवर्धनासाठी जेवढे प्रयत्न होतात, तेवढे अन्य प्राणी व पक्ष्यांच्या बाबतीत होताना दिसत नाहीत. राज्यातील सारस पक्षांचे वास्तव्य एकटय़ा गोंदिया-भंडारा जिल्ह्यत आहे. मात्र, नाममात्र सारस पक्षांच्या अस्तित्वाला उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.

सारस पक्ष्यांचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी दशकभराहून अधिक काळापासून या जिल्ह्यातील सारस संवर्धक प्रयत्नशील आहेत. २०१७ साली ३५ ते ३८ संख्येने अस्तित्वात असलेल्या सारसांची संख्या  २०१८ मध्ये ४० ते ४२ आणि २०१९ मध्ये ४५च्या जवळपास पोहोचली आहे. आतापर्यंत शेतीवर फवारण्यात येणारी किटकनाशके सारसांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरत होती. मात्र, २० डिसेंबर २०१७ ला एक मादी सारस आकाशात झेप घेत असताना उच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये अडकली. अवघ्या २४ तासात तिचा मृत्यू झाला. सालेकसा येथेही वीजप्रवाहाने सारसाचा मृत्यू झाला. रानडुकरापासून शेतपीक वाचवण्यासाठी शेतात सोडलेल्या वीजप्रवाहात हा पक्षी अडकला. वर्षभरानंतर हे सत्य उघडकीस आले.

गोंदिया तालुक्यातील दासगाव ते बलमाटोला मार्गावर शुक्रवारी सायंकाळी एक सारस पक्षी  मृतावस्थेत आढळला. हा सारस दोन वर्षांचा असून त्याचे वजन साडेसात किलो आहे. पंचनामा व नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आकाशात झेप घेण्याच्या प्रयत्नात ११ केव्हीच्या उच्चदाब वीजवाहिनीत अडकून तो मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.  वाघाएवढेच महत्त्व असलेला हा पक्षी, पण तरीही दुर्लक्षितच आहे. दोन वर्षांपासून सारसांची संख्या स्थिर आहे, पण तरीही ते सुरक्षिततेच्या कक्षेत नाहीत. घरटय़ांची संख्या कमी होत आहे. शेतातील सारसांची घरटी उध्वस्त करु नये म्हणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची एकच योजना वनखात्याकडून आणली गेली. मात्र, संवर्धनाचा कोणताही आराखडा तयार झालेला नाही. सेवा या स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवींनी राज्यातील सारस त्यांच्या जिल्ह्यात टिकवून ठेवला आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेशात सारसांची स्थिती चांगली आहे. २०१९च्या सारस गणनेत बालाघाट परिसरात ५२ ते ५४ इतके सारस पक्षी आढळले.

आतापर्यंत शेतकऱ्यांनाच सारसाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले जात होते, पण आता उच्चदाबाच्या वीजवाहिन्यादेखील सारसांची संख्या कमी करत आहेत. केवळ स्वयंसेवींच्या भरवशावर राहून चालणार नाही, तर महाराष्ट्रातही सारस संवर्धन आराखडा तयार करण्याची गरज आहे.

-सावन बाहेकर, अध्यक्ष, सेवा संस्था