बुलढाणा : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम पांडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘रुद्र-हॉस्पिटल ऑन व्हिल्स’ आज, शनिवारी शेगाव रेल्वे स्थानकात दाखल झाली. ‘रुद्र’मध्ये विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून आज रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात नऊ जिल्ह्यांचा समावेश असून १ हजार ५३ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा हा विभाग आहे. विविध रेल्वेस्थानकावर कार्यरत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा, विशेषतः तज्ज्ञांच्या सल्ला मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. जवळपासच्या शहरांमध्ये पॅनेलमध्ये समाविष्ट रुग्णालये उपलब्ध आहेत. मात्र, अनेकांसाठी कामाच्या थकवणाऱ्या वेळापत्रकानंतर लांबचा प्रवास करणे हे एक कठीण काम आहे. ही गंभीर समस्या ओळखून, भुसावळ विभागाने एका जुन्या ‘थ्री-एसी कोच’चे पूर्णपणे कार्यरत रुग्णालयात रूपांतर केले. ही आरोग्य रेल्वे आज, शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव स्थानकावर पोहचली.
कोचमध्ये, तज्ज्ञांची एक टीम, गर्भवती मातांसाठी स्त्रीरोग सेवा, नेत्ररोग समस्यांचे निदान आणि उपचार, ईसीजी मशीन आणि रक्त तपासणी, आदी सुविधा उपलब्ध आहेत. यावेळी शेकडो कर्मचारी रुग्णांवर तपासणी आणि उपचार करण्यात आले. भुसावळ विभागाचे डीआरएम पांडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला. आजच्या शिबिरात सीएमएस भुसावळच्या डॉ. मंगला नारायणे, सीनियर डीएमओ भुसावळ डॉ. पवन खंडेलवाल, डॉ. दत्ता जाधव, डॉ. गोरख, डॉ. जितेश ठाकरे, एडीएमओ डॉ. अखिलेश कश्यप, डॉ. अखिलेश कलावटे, स्वास्थ निरीक्षक लाभिणी पाटील, परिवहन निरीक्षक पी.एम. पुंडकर, रेल्वे स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे, तिकीट निरीक्षक एन.आर. कारळे, मुख्य बुकिंग पर्यवेक्षक हर्षल महाजन यांनी सेवा दिली.
काय ‘रुद्र’ आहे?
‘रुद्र’ हा भुसावळ रेल्वे विभागाने सुरू केलेला एक उपक्रम आहे, जो एका थ्री-एसी डब्यात फिरणाऱ्या रुग्णालयासारखा आहे. दुर्गम भागातील रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेळेवर आरोग्य सेवा, तसेच आजारांचे लवकर निदान करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘रुद्र’द्वारे १६ हजार ५०० हून अधिक रेल्वे कर्मचारी आणि ३० हजार पेन्शनधारकांना मदत मिळते. ‘रुद्र’मुळे, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा अधिक सोयीची झाली आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आता त्यांच्या कामाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा मिळवता येतात.