अमरावती : पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर पती संतापला. त्‍याने पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. पत्नीने ही बाब प्रियकराच्‍या कानावर घातली. प्रियकराने त्‍याच्‍या अन्‍य तीन साथीदारांच्‍या मदतीने हत्‍येचा कट रचला आणि प्रेयसीच्‍या पतीची गळा आवळून हत्‍या केली. ही घटना शिरखेड पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील राजूरवाडी येथील शेतशिवारात सोमवारी घडली. पोलिसांनी अवघ्‍या काही तासांत गुन्‍ह्याचा छडा लावून आरोपींना गजाआड केले.

किसन वसंतराव धुर्वे (४७, रा. राजूरवाडी) असे मृताचे नाव आहे. किसनचा मृतदेह हा त्‍याचा भाऊ सतीश धुर्वे याला राजूरवाडी येथील एका शेतात आढळून आला. किसनची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्‍या केल्‍याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. सतीश धुर्वे याने पोलिसांत तक्रार दाखल केल्‍यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्‍हा त्‍यांना धक्‍कादायक बाब कळली. पत्‍नीचे गावातीलच बबलू उर्फ इजाज खान शब्‍बीर खान पठाण (४०, रा. राजूरवाडी) याच्‍यासोबत अनैतिक संबंध असल्‍याची माहिती किसनला कळली होती. तेव्‍हापासून तो अस्‍वस्‍थ झाला होता. किसन हा पत्नीला मानसिक त्रास देऊ लागला होता. या प्रकाराची माहिती किसनच्‍या पत्नीने आरोपी बबलू याला दिली. नंतर किसनचा काटा काढण्‍याच्‍या उद्देशाने आरोपी बबलू याने आपल्‍या साथीदाराच्‍या मदतीने हत्‍येचा कट रचला.

हेही वाचा – वाघांची शिकार आणि १७ मिश्यांची तस्करीही, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी बबलू याने किसनला राजूरवाडी येथील शेत शिवारात बोलावून घेतले आणि तेथे त्‍याची गळा आवळून हत्‍या केल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. पोलिसांनी आरोपी बबलू याच्‍यासह त्‍याचे साथीदार सागर रमेशराव मातकर (३०, रा. राजूरवाडी) कुणाल जानराव उईके ( २४, रा. तळेगाव ठाकूर) आणि एक विधिसंघर्षित बालक यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांची चौकशी केल्‍यानंतर आरोपींनी गुन्‍ह्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे यांच्‍या मार्गदर्शनात स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्‍हे यांच्‍या नेतृत्‍वात सहायक पोलीस निरीक्षक विष्‍णू पांडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलीस अंमलदार संतोष मुंदाणे, बळवंत दाभणे, पंकज फाटे, प्रमोद शिरसाट यांच्‍या पथकाने केली.