नागपूर : वर्धा येथून नागपूरकडे भरधाव येत असलेल्या कारने रस्त्यालगत उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. यात पती-पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर ६ जण गंभीर आहेत. अपघाताची ही भीषण घटना रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वर्धा-नागपूर महामार्गावर बुटीबोरी परिसरात घडली. राजेश मुरारीलाल श्रीवास्तव (५२) व पूजा राजेश श्रीवास्तव (४५) रा. रामनगर, वर्धा असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. जखमी राणी श्रीवास्तव (६३), अमन श्रीवास्तव (२६), संगीता श्रीवास्तव (४८), राकेश श्रीवास्तव (५२) आणि अनिकेत श्रीवास्तव (२२) सर्व रा. रामनगर, वर्धा व चालक सारंग गोल्हर (२६) रा. धामणगाव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यातील वाहनावर दगड भिरकावला; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यानची घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्धेतील रामनगर परिसरात राहणारे श्रीवास्तव कुटुंब रविवारी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी नागपूरसाठी निघाले. सगळे एमएच-४०बीई-३१९१ क्रमांकाच्या कारमध्ये होते. चालक सारंग गोल्हर हा कार भरधाव पळवत होता. वर्धा-नागपूर महामार्गावर बुटीबोरी परिसरात युको बँकसमोर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित कारने रस्त्यालगत उभ्या एमएच-२९/एके-६१८६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, कार उलटून पूर्णत: क्षतिग्रस्त झाली. यात राजेश व पूजा श्रीवास्तव या दाम्पत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबातील इतर ६ जण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. बुटीबोरी पोलीस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले. नागरिकांच्या मदतीने जखमींना क्षतिग्रस्त वाहनातून बाहेर काढत रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजेश व पूजा यांचा मृत्यू झाला असल्याने त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.