अमरावती : युद्धजन्य परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटन्ट) अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) जाहीर केले आहे. त्यानुसार आता सीए परीक्षा १६ ते २४ मे दरम्यान घेतल्या जाणार आहे.
संस्थेने आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते १४ मे या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात इंटरमिजिएट परीक्षेत गट एकची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी, तर गट दोनमधील परीक्षा ९, ११ आणि १४ मे रोजी होणार होती. तसेच, अंतिम (फायनल) परीक्षेतील गट एकमधील परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, तर गट दोनमधील परीक्षा ८, १० आणि २३ मे रोजी घेण्याचे नियोजन होते.
मात्र, देशाच्या सीमेवर उद्भवलेली तणावपूर्ण परिस्थिती, सुरक्षिततेबाबतची काळजी यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.मे सत्रासाठी सीए फाउंडेशन परीक्षा त्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार म्हणजेच १५, १७, १९ आणि २१ मे रोजी होणार आहे. सीए परीक्षेशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवारांना इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असेही विद्यार्थ्यांना सूचित करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी वेळेत आपली प्रवेशपत्रे डाउनलोड करून ठेवावीत आणि नवीन वेळापत्रकानुसार तयारी करावी, असे आवाहन ‘आयसीएआय’ने केले आहे. परीक्षेसाठी केंद्रावर उपस्थित राहताना ओळखपत्र, प्रवेशपत्र आणि आवश्यक कागदपत्रे बरोबर ठेवणे बंधनकारक आहे. परीक्षा सुरू होण्याच्या किमान ३० मिनिटे अगोदर केंद्रावर पोहोचण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. असेही अधिकृत अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
वेळेत बदल नाही
देशातील सर्व राज्यांमध्ये सीए परीक्षा घेतल्या जातात. याशिवाय, ही परीक्षा भारताबाहेरील नऊ परदेशी शहरांमध्ये देखील घेतली जाते. कुवेत, बहरीन, मस्कत, थिम्पू (भूतान), अबूदाबी, रियाध (सौदी अरेबिया), दोहा, काठमांडू आणि दुबई येथेही परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यानुसार युद्धजन्य स्थितीत परीक्षा पार पाडणे आयसीएआयला अशक्य असल्यानेच त्या रद्द केल्या होत्या. आता युद्धबंदीनंतर पुन्हा त्यांचे फेरवेळापत्रक जाहीर करत आयोजन करण्यात आले. ‘आयसीएआय’च्या पत्रकान्वये परीक्षा केंद्रे आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परीक्षा नियोजित केंद्रे आणि वेळेनुसार (दुपारी २ ते ५ आणि ६) घेतली जाईल.