शहराच्या विविध भागात मेट्रो रेल्वेचे काम सुरू असून त्यासाठी मार्गात येणारे वृक्ष तोडल्या जात आहे. महापालिकेने त्यासाठी परवानगी दिली असली तरीही सध्या शहरात मेट्रोच्या नावावर अवैध वृक्षतोडीचा नवा प्रकार सुरू झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मेट्रो रेल्वेमार्गाच्या मध्ये येणाऱ्या वृक्षांची तोड करण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेण्यात येत आहे. जितकी झाडे तोडली, त्याच्या पाचपट झाडे लावणे आणि ती जगवण्याची अट त्यासाठी टाकण्यात आली आहे. महापालिकेने यासाठी मेट्रोकडून सुरक्षा ठेव घेतली आहे. वृक्षांची वाढ झाल्यानंतर ही रक्कम मेट्रोला परत मिळणार आहे. वनखात्याच्या दोन कोटी वृक्षारोपण मोहिमेच्या वेळी मेट्रोने अंबाझरी येथे केलेले वृक्षारोपण सर्वाधिक यशस्वी ठरले.
दरम्यान, मेट्रोच्या नावाखाली आता शहरातल्या अनेक भागात सध्या अवैध वृक्षतोडीचे प्रकार सुरू आहेत. परवानगी न घेता, अनामत रक्कम जमा न करता, एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे न लावता शहरात अनेक ठिकाणी खासगीरित्या वृक्षतोड सुरू आहे. गेल्या काही वर्षांत ‘ग्रीन विजिल’ संस्थेमुळे अवैध वृक्षतोडीचे अनेक प्रकार उघडकीस आले. परिणामी, महापालिकेच्या उद्यान विभागानेही अवैध वृक्षतोडीबाबत त्यांच्या मोहिमेला वेग दिला आहे. अनेक नागरिक झाडांच्या फांद्या घरात येतात म्हणून तर काही ठिकाणी बांधकामात अडथळा येणारी झाडे तोडली जात आहेत. मात्र, ही वृक्षतोड करताना परवानगीचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे वृक्षतोडीबाबत नागरिकांमध्ये थोडा वचक असला तरीही मेट्रोच्या नावावर वृक्षतोडीचा प्रकार शहरात पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे.
आम्ही जेव्हा जेव्हा अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी जातो, तेव्हा आम्हालाही असे सांगण्यात आले की मेट्रोसाठी झाडे कापली जात आहेत. मात्र, अधिक चौकशी केल्यानंतर ती वृक्षतोड मेट्रोसाठी नव्हे, तर खासगीरित्या नागरिक करत असल्याचे अनेक प्रकरणात लक्षात आले आहे, असे ग्रीन विजिलचे मेहूल कोसूरकर, कल्याणी वैद्य यांनी सांगितले.