पद्मभूषण डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांचा इशारा; वेळीच सावध न झाल्यास देशासाठी धोक्याची घंटा

नागपूर : करोनाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. मात्र, आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा थंड हवेच्या प्रदेशांसह ग्रामीण भागातही प्रदूषणाचे आजार वाढले असून याविषयी वेळीच सजग होणे आवश्यक आहे. अन्यथा, हवामानातील बदलाचे आरोग्यावरील दुष्परिणाम करोनापेक्षाही घातक ठरतील, अशी भीती पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (पीएचएफआय)चे पद्मभूषण डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी व्यक्त केली.

अ‍ॅकॅडमिक ऑफ मेडिकल सायन्स आणि डायबेटीक असोसिएशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात ‘करोनानंतरचे जग’ या विषयावर डॉ. रेड्डी यांनी मार्गदर्शन केले. करोनामुळे आरोग्य यंत्रणा, राज्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता आली. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी सामान्य नागरिकांनीही शेकडो प्रयत्न केले. आरोग्य यंत्रणेसाठीही करोनाचा काळ फार भयावह होता. यामुळे आपल्या शहरी आणि ग्रामीण आरोग्य यंत्रणेमधील जमेच्या बाजू आणि उणिवा समोर आल्या. अशा संकट काळात खासगी आरोग्य यंत्रणांची महत्त्वाची भूमिकाही आपण पाहिली. आता भारतातून करोनाचा धोका कमी होताच आपण पुन्हा गाफील झाले आहोत. वातावरणातील बदलामुळे करोनापेक्षाही भयंकर आजार समोर येत असून देशाच्या भविष्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

प्रदूषण, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिग आणि ओझोन थर कमी होणे यासारख्या पर्यावरणीय घटकांचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. प्रदूषण आणि हवामान बदलामुळे मोठय़ा संख्येने लोकांना आरोग्याविषयी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे भविष्यात हवामान बदलाच्या दुष्परिणामांविषयी अधिक सजग होणे काळाची गरज आहे. निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. आपले आरोग्य हे थेट पर्यावरणाशी निगडित आहे. हवामान बदलामुळे २०३० आणि २०५० मध्ये कुपोषण, मलेरिया, अतिसार आणि वाढत्या उष्णतेमुळे दरवर्षी अंदाजे २ लाख ५० हजारांहून अधीक मृत्यू होऊ शकतात, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप वाढणार

करोनानंतर जगात अनेक बदल दिसून आले. मात्र, करोनानंतरच्या जगाकडे पाहताना हवामान बदलामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हवामान बदलामुळे भविष्यात डेंग्यू, मलेरिया, त्वचा अशा आजारांचे रुग्ण अधिक पाहायला मिळणार, असा इशाराही डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी दिला.