कामाच्या ताणामुळे गर्भवती महिला पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. महिलांना प्रसूतीपूर्व काळात चांगले वातावरण मिळणे अपेक्षित असते. तणावमुक्त वातावरणामुळे महिला व बाळावर चांगला परिणाम होतो. मात्र, महिला पोलिसांच्या कार्यशैलीत सतत तणावाला सामोरे जावे लागते. परिणामी, त्यांच्या गर्भावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे या काळात कार्यालयीन व तणावमुक्त जबाबदारी सोपवण्याची मागणी काही महिला पोलिसांनी केली आहे.

शासनाच्या इतर विभागांमध्ये कार्यरत आणि पोलीस विभागातील महिलांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये बरेच अंतर आहे. त्यामुळे कार्यालयीन जबाबदारी, कामाचे तास कमी करणे, तणावमुक्त काम मिळणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा महिला पोलिसांनी व्यक्त केली आहे. गर्भावस्थेत महिलांना अधिक काळजी आणि विश्रांतीची गरज असते.  या काळात स्त्रीने कायम प्रफुल्लित व आनंदी राहावे, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, महिला पोलिसांचे क्षेत्र सतत तणावाचे असल्याने त्यांना याचे वाईट परिणाम भोगावे लागत असल्याचे काही महिला पोलिसांनी सांगितले.

गर्भपाताचे प्रमाण वाढतेय

महिला पोलिसांना अशा अवस्थेमध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लिपिक, कार्यालयील काम देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्याने आजारांनाही सामोरे जावे लागते. कामाच्यावेळेचे नियोजन नसणे, कुटुंबीयांपासून दूर राहणे, जादा कामाचा ताण आणि रोजचा तणावाचा खडतर प्रवास आदी कारणांमुळे गर्भवती महिला पोलिसांच्या गर्भपाताचेही प्रमाण वाढत आहे. तसेच कामात आणि खासगी जीवनामध्ये नकारात्मकता येण्याचे प्रमाण वाढत आहे.

समान वागणुकीची मागणी

महिलांना कायमच कमीपणाच्या भावनेने हिणवण्याचा प्रकार हा पोलीस विभागातही असल्याचे काही महिला पोलिसांनी सांगितले. पुरुष मंडळी दहा वेळा कार्यालय सोडून चहा प्यायला गेले तर कामातून थोडी मोकळीक म्हणून त्याकडे बघितले जाते. मात्र, एखादी महिला पोलीस जर कामाच्या वेळात थोडी जरी बाहेर गेली तर तिला जाब विचारला जातो, याकडेही काही महिला पोलिसांनी लक्ष वेधले.