अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात अमली पदार्थ पुरविण्यासाठी वेगळ्याच पद्धतीचा वापर केला जात असून कारागृहाच्या आवारात अमली पदार्थाने भरलेले चेंडू फेकण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत निदर्शनास आल्या आहे. आता पुन्हा एकदा प्लास्टिक टेपने गुंडाळलेला चेंडू फेकण्यात आला. या चेंडूत चक्क गोड सुपारी, चॉकलेट, काजळाची डबी, नागपुरी खर्रा आणि गांजासारखा पदार्थ आढळून आला आहे. या प्रकारांनी कारागृह प्रशासन देखील चक्रावून गेले आहे.
कारागृहातील पोलीस शिपाई मंगेश सोळंके हे सेवेवर असताना त्यांना १४ क्रमांकाच्या बॅरेकमधील टिनाच्या शेडवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांना त्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला एक चेंडू आढळून आला. त्यांनी लगेच या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळवली. मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना देखील याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
हेही वाचा : गोंदिया : ११२६ हेक्टर सरकारी जमिनीवर अतिक्रमण; २० हजार घरे बांधली
त्यानंतर कीर्ती चिंतामणी यांच्या आदेशानुसार त्यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचांसमक्ष जेव्हा या चेंडूचे निरीक्षण करण्यात आले, तेव्हा त्यात गोड सुपारी, पाच सेंटर फ्रूट चॉकलेट, किकी काजळाची डबी, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला नागपुरी खर्रा, मुरूमाचा दगड आणि एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुकलेला काळसर हिरव्या रंगाचा गांजासारखा अमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसांत कारागृहाच्या आवारात चेंडू फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.