अमरावती : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावावर सायबर भामट्यांनी देशभरात धुमाकूळ घातला असून हजारो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. महिला, वृद्ध आणि निवृत्त कर्मचारी हे अशा चोरट्यांचे प्रमुख लक्ष्य असतात. अमरावतीत ‘डिजिटल अरेस्ट’चे आणखी एक धक्कादायक प्रकरणी समोर आले आहे. पाच ते सहा कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, त्यात आपल्या अटकेचे वारंटदेखील निघाले आहेत, अशी धमकीवजा माहिती देत एका निवृत्त अभियंत्याला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात आली आणि अटकेची भीती दाखवून त्यांची ३४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली.
तब्बल २० तासांहून अधिक काळ ‘डिजिटल अरेस्ट’ झालेले ७० वर्षीय तक्रारदार हे महावितरणचे निवृत्त अभियंता आहेत. ८ जुलै रोजी त्यांना व्हॉट्सॲपहून संपर्क साधण्यात आला. आपल्या आधार कार्डचा वापर करून काढलेल्या कॅनरा बँकेच्या खात्यातून ५ ते ६ कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, त्यात आपलेही नाव आरोपी म्हणून आल्याचे पलीकडून सांगण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना व्हिडीओ कॉल आला.
मुंबईतील जेबी अंधेरी मार्ग पोलिस ठाण्यात आपल्याविरुद्ध ५ जून रोजी घोटाळ्याचा गुन्हा दाखल असून, त्यात आपल्याविरुद्ध न्यायालयाने पकड वॉरंट काढल्याची माहिती निवृत्त वृद्धाला देण्यात आली. त्यांच्या बँकेत किती रक्कम जमा आहे, अशी विचारणाही झाली. आपल्या सिनिअर पोलीस ऑफिसरशी बोला, असे त्यांना सांगण्यात आले. पाठीमागे महाराष्ट्र पोलीस असे लिहून असलेल्या कार्यालयातील बनावट पोलीस अधिकाऱ्याने निवृत्ताला तुमच्या नावे वॉरंट आहे, घरातच राहा, घर सोडू नका, पोलीस तुम्हाला केव्हाही अटक करण्यासाठी येऊ शकतात, असे बजावले. त्यामुळे निवृत्त वृद्ध भयग्रस्त झाले.
अटक टाळायची असेल तर सुरक्षा अनामत रक्कम म्हणून ३४ लाख रुपये भरावे लागतील, असे वृद्धाला सांगण्यात आले. अटकेच्या भीतीपोटी ९ जुलै रोजी बँक गाठत वृद्धाने तब्बल ३४ लाख रुपये आरोपींच्या खात्यात आरटीजीएस केले. मात्र, काही वेळानंतर अधिक पैशाची मागणी झाल्याने त्यांना फसवणुकीची जाणीव झाली. विशेष म्हणजे आरोपींना रक्कम पाठविण्यासाठी निवृत्त वृद्धाने आपली बचत ठेव मोडली. पुढील तपास सायबर ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार हे करीत आहेत. सायबर भामट्यांनी या निवृत्त अभियंत्याला अटकेची प्रचंड भीती दाखविली. त्यामुळे त्यांनी त्याबाबत कुणालाही काहीही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी तडक बँक गाठून त्यांनी आयुष्यभर साठविलेली रक्कम आरोपींना पाठवली.