बुलढाणा : येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पार पडलेल्या आढावा बैठकीत युवक काँग्रेसने बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करून धमाल उडवून दिली. एवढेच नव्हे तर प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याकडे त्यांनी लेखी मागणीही केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी राष्ट्रवादी भवन येथे संघटनात्मक आढावा घेतला. प्रास्ताविकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांनी संघटनेचा आढावा सादर केला. यानंतर त्यांनी थेट संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी बुलढाणा लोकसभा लढवावी अशी मागणी केली. दरम्यान या मागणीमुळे जिल्हा राष्ट्रवादीमध्ये सकारात्मक पडसाद उमटले. दुसरीकडे यामुळे खासदार व उमेदवारीचे दावेदार प्रतापराव जाधव यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचे कान टवकारले. बुलढाण्यावर नजर असलेल्या अजितदादा गटाने मागणीची दखल घेतल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा : बाबा मला माफ करा! वडिलांना चिठ्ठी लिहून तरुणाने केली आत्महत्या
काय आहे निवेदनात?
दरम्यान जिल्हाध्यक्ष पाटील यांनी यावरच न थांबता प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे लेखी मागणीही केली. महेबूब शेख यांना दिलेल्या निवेदनातून वरील मागणीसाठी संस्थापक शरद पवार यांना साकडे घालण्याची विनंती करण्यात आली आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. दरवर्षी जिजाऊ जयंतीला सिंदखेडराजात आवर्जून येणाऱ्या खासदार सुळे यांचे जिल्ह्याशी ऋणानुबंध जुळले आहे. त्यांना बुलढाण्यातून उमेदवारी दिली तर जिल्ह्यासह विदर्भातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल. त्यांचे चांगले परिणाम लोकसभा निवडणुकीत व भावी काळात दिसून येतील असा आशावाद पाटील यांनी बोलून दाखविला आहे.
हेही वाचा : शाळांमध्येही रामनामाचा जयघोष, विवेकानंद विद्यालयातील ५०० विद्यार्थ्यांनी साकारले ‘श्रीराम’
‘अपयशी’ ट्रॅक रेकॉर्ड
दरम्यान बुलढाणा लोकसभेतून एकसंघ राष्ट्रवादीने चारदा अपयशी झुंज दिली आहे. पक्ष स्थापना झाल्यावर १९९८ आणि सन २००९ मध्ये मतदारसंघ ‘खुला’ झाल्यावर २००९, २०१४ व २०१९ अश्या चारही लढतीत पक्ष अपयशी ठरला. दोनदा माजी मंत्री राजेंद्र शिंगणे सारखा मोहरा असतानाही पराभव नशिबी आला.