चंद्रपूर : भाजपाचे स्थानिक उमेदवार लक्ष्मीदर्शन करून काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आहे.तेव्हा निवडणुकीत येणारी लक्ष्मी स्वीकारा आणि मतदान करा असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. दरम्यान, आमदार धानोरकर यांनी सरळ सरळ पैसा स्वीकारा असे सांगितल्याने उलट सुलट चर्चाही सुरू झाली आहे.

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा व बैठक इंम्पेरिअल पॅलेस येथे झाली. याप्रसंगी आमदार धानोरकर बोलत होत्या. यावेळी मंचावर काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार मुकूल वासनिक, खासदार चंद्रकांत हांडोरे, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार वामनराव कासावार उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना काँग्रेस उमेदवार आमदार धानोरकर यांनी, महायुतीचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली.

हेही वाचा…वंचितला काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा वाढ

भाजपाचे स्थानिक उमेदवार पैशाच्या बळाचा वापर करीत आहेत. लक्ष्मी दर्शन घडवून काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेत आहेत. तेव्हा निवडणुकीत येणारी ही लक्ष्मी परत करू नका, निवडणुकीत आलेली ही लक्ष्मी प्रत्येकाने स्वीकारावी आणि काँग्रेस पक्षाला मतदान करा असेही आवाहन आमदार धानोरकर यांनी केले.

हेही वाचा…यवतमाळात वंचितला धक्का! उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने निवडणुकीपासून राहणार ‘वंचित’

दरम्यान, निवडणुकीत लक्ष्मीदर्शन होत असल्याचे आमदार धानोरकर यांनीच सांगितल्याने कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याला होकार दर्शविला. मी रडणारी नाही तर मी लढणारी आहे असे सांगतांना धानोरकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीच्या रॅलीत जनसागर उसळला होता असे सांगितले.