चंद्रपूर : चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले. शिवशंकर मोरे, असे निलंबित वनकर्मचाऱ्याचे नाव आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या आर्णी येथील सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याने विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मोरे यांच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली असून त्यांनी व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यांनी स्टेटसद्वारे ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण केला आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला, असे या तक्रारीत नमूद आहे. हेही वाचा : युगांडाहून दोहामार्गे ८.८१ कोटींच्या अंमलीपदार्थाची तस्करी; नागपूर विमानतळावर एकाला अटक सरकारी कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारचे वर्तन अपेक्षित नाही आणि हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असेही पत्रात नमूद आहे. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.