नागपूर : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसोबत यंदा शहराच्या सीमावर्ती भागात व्यवसाय करणाऱ्या विटभट्टी मालकांनाही फटका बसला असून कच्च्या विटांची पाण्यामुळे माती झाल्याने सुमारे २५ लाख रुपयांची हानी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. नागपुरात पुनापूर, पारडी या भागात मोठ्या प्रमाणात विटभट्ट्यांचा व्यवसाय चालतो. साधारणपणे या भागात ५० ते ६० भट्ट्या असून सुमारे दीडशेवर अधिक मजूर काम करतात. मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व वादळाचा या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे कच्च्या विटांची माती झाली आहे. त्यामुळे त्यावर झालेला सर्व खर्च पाण्यात गेला आहे. वादळामुळे भट्टीतील राखही उडून गेल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. हेही वाचा - वर्धा : बुद्ध पौर्णिमेस होणारी वन्यजीव गणना रद्द, पैसे परत… उन्हाळ्यात घर व इतरही बांधकामांना वेग येतो. त्यासाठी लागणाऱ्या विटांचा पुरवठा करणारे व्यावसायिक या हंगामासाठी वर्षभर तयारी करतात. यंदा मार्च महिन्यापासूनच कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे. पूर्ण एप्रिल आणि आता मेच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे विक्रेत्यांचा हंगामच संकटात सापडला आहे. पारडी व पुनापूर भागात मोकळ्या जागेत पाणी साचते. पाण्याचे लोंढे भट्टीत शिरल्याने तेथे असलेल्या कच्च्या विटा वाहून गेल्याचे कुंभार सेवा समाज पंच समितीचे राजीव खरे यांनी सांगितले. शासनाने या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.