अमरावती : दुचाकीने आलेल्या अज्ञात तिघांनी मारहाण करून कारमधील २३ लाख रुपयांची रोकड लांबविल्याची तक्रार २६ डिसेंबर रोजी येवदा पोलिसांत दाखल करण्यात आली होती.स्थानिक गुन्हे शाखेने या घटनेचा उलगडा करीत तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. व्यवस्थापकानेच चालक व अन्य एकासोबत लुटीचा तो कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.सौरभ मनोज साहू (२३) रा. मसानगंज, अमरावती, श्रीजीत मुरलीलाल साहू (३१) रा. पटवा चौक, अमरावती व प्रमोद नामदेवराव ढोके (४२) रा. विलासनगर, अमरावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हनुमान ऑइल मिलचे संचालक दर्शित हनुमान अग्रवाल यांनी त्यांचा चालक प्रमोद ढोके आणि व्यवस्थापक सौरभ साहू यांना अकोला येथे एका कारने एका व्यावसायिकाकडून २३ लाख ५ हजार ४८० रुपये पगडी रक्कम आणण्यासाठी पाठविले होते. ती रक्कम घेऊन परत येत असताना लासूर गावासमोर तीन अज्ञातांनी कारला दुचाकीने धडक दिली.सौरभ साहू व प्रमोद ढोके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील मोबाइल व रोकड असलेली थैली जबरदस्तीने हिसकावून ते पळून गेले, अशी तक्रार येवदा पोलिसांत नोंदविण्यात आली होती. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला, स्थानिक गुन्हे शाखाही या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होती.
स्थानिक गुन्हे शाखेने सर्वप्रथम दर्शित अग्रवाल यांच्याकडून गुन्ह्याची पार्श्वभूमी समजून घेतली. तसेच सौरभ साहू व चालक प्रमोद ढोके यांना विचारपूस केली. दोघांच्याही जबाबामध्ये तफावत दिसून आल्याने सौरभ साहू वाला पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पैशांची गरज असल्याने आपण श्रीजीत साहू आणि प्रमोद ढोके यांच्यासोबत कट रचून गुन्हा केल्याची कबुली सौरभ साहू याने दिली. ती सर्व रक्कम श्रीजीत साहू याने सोबत नेल्याचे सांगितले. त्यावरून श्रीजीत याला ताब्यात घेऊन त्याच्या घरातून २३ लाख ५ हजार ४८० रुपये व दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, अंमलदार त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, शकील चव्हाण, सचिन मिश्रा, सुधीर बावने, सय्यद अजमत, नीलेश डांगोरे, सागर धापड, रितेश वानखडे यांनी केली.