नागपूर : रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील ७५ वाघांपैकी तब्बल २५ वाघ गेल्या एक वर्षात बेपत्ता झाले आहेत, असे राजस्थानचे मुख्य वन्यजीव रक्षक पवनकुमार उपाध्याय यांनी सांगितले. राजस्थानमधील रणथंबोर येथून वाघ बेपत्ता होण्याची ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही या राष्ट्रीय उद्यानातून वाघ बेपत्ता झाले आहेत.

एका वर्षात एवढ्या मोठ्या संख्येने वाघ बेपत्ता होण्याची मात्र ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२२ दरम्यान रणथंबोरमधून तेरा वाघ बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती. दरम्यान, या बेपत्ता झालेल्या वाघांच्या चौकशीसाठी राजस्थानच्या वन्यजीव विभागाने सोमवारी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. ही समिती देखरेखीच्या नोंदींचे पुनरावलोकन करेल आणि उद्यान अधिकाऱ्यांकडून त्रुटी आढळल्यास कारवाईची शिफारस करेल. १७ मे २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत न दिसलेल्या १४ वाघांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासंदर्भात चार नोव्हेंबरला अधिकृत आदेश काढण्यात आला.

हेही वाचा : राहुल गांधी हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे विरोधी…

या आदेशात असे म्हटले आहे की, रणथंबोरच्या निरीक्षण मुल्यांकनातून वाघ बेपत्ता झाल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. यासंदर्भात रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्र संचालकांना वारंवार नोटीस पाठवण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही कोणत्याही लक्षणीय सुधारणांची नोंद करण्यात आलेली नाही. १४ ऑक्टोबर २०२४ च्या अहवालानुसार, एक वर्षांहून अधिक काळापासून ११ वाघांचा काहीच ठावठिकाणा नाही. तर इतर चौदा वाघांची स्थितीदेखील सारखीच आहे. त्यामुळे रणथंबोरमधील बेपत्ता वाघांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, असेदेखील या आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा : जातीय जनगणनेची गोष्ट करताच मोदींची झोप उडाली… आता कितीही अडवण्याचा…राहुल गांधींच्या वक्तव्याने…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समिती दोन महिन्यात अहवाल सादर करेल. दरम्यान, आम्ही वाघांच्या देखरेखीतील त्रुटी ओळखल्या आहेत आणि आम्हाला त्या दूर करायच्या आहे, असे मुख्य वन्यजीव रक्षक पवनकुमार उपाध्याय म्हणाले. साप्ताहिक निरीक्षण अहवालात वाघांची सापळ्यात नोंद झालेली नाही. तर कॅमेरा ट्रॅपमध्येही काहीही आढळले नाही. उद्यानावरील दबाव कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये बफर झोनमधून गावे स्थलांतरित करणे समाविष्ट आहे, परंतु २०१६ मध्ये शेवटचे स्थलांतरण झाल्यामुळे प्रगती मंदावली आहे. ७५ वाघांमध्ये तरुण वाघ आणि बछड्यांचा समावेश आहे. उद्यानाचे क्षेत्र ९०० चौरस किलोमीटर असून वाघांनी बाहेर पडू नये म्हणून याठिकाणी अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने २००६ ते २०१४ दरम्यानक केेलेल्या अभ्यासानुसार रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात सुमारे ४० प्रौढ वाघ सुरक्षितपणे राहू शकतात.