अकोला : भारतात श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून रावणाचे दहन होणे, ही सर्वसामन्य बाब; परंतु, ‘एका ठिकाणी रावणाची पूजा होते, तीही सद्गुणांमुळे’हे सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र, हे सत्य असून, अकोला जिल्ह्यातील सांगोळा नावाच्या गावी रावणाची सद्गुणांमुळे पूजा केली जाते. या प्रथेला तब्बल २११ वर्षांची प्राचीन परंपरा लाभली आहे.

वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली. रावणात दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांमुळे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावण दहनऐवजी पूजा केली जाते. बाळापूर तालुक्यातील वाडेगावनजीक हे गाव आहे. गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे. उघड्यावर ही मूर्ती वसलेली आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धस्थानही आहे. रावण या गावाचे दैवत असून ही मूर्ती स्थापन केल्यापासून गावावरील संकटे दूर झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

हे ही वाचा…विजयादशमीचा सोहळा, पण… संघ स्वयंसेवकांच्या कवायती झाल्याच नाहीत, कारण…

रावण स्वभावाने कपटी, अहंकारी होता, असे मानल्या जाते. अमर्याद लालसा आणि अर्निवचनीय महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्याच्यात असुरी वृत्ती होती. रावणातील हे दुर्गुण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धिमान, शक्तिशाली, वेदाभ्यासी आदी गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. २११ वर्षांपूर्वी या भागात वास्तव्य असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिम असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात. आजही त्यातील काही उपक्रम सुरू आहेत. ऋषी ब्रह्मालीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनवण्याचे काम सोपवण्यात आले. पण त्याच्या हातून दशानन रावणाची मूर्ती घडली. दहा तोंडे, काचा बसवलेले २० डोळे, सर्व आयुधे असलेले २० हात, अशी विराट मूर्ती या मूर्तिकाराने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती, हा योगायोग श्रद्धळू ग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. भक्तिभावाने रावणाची पूजा केली जाते. दसऱ्यानिमित्त सर्वत्र रावणाचे दहन होत असतांना या गावात मात्र विशेष पूजा होते. गावात रावणाचे भव्य मंदिर बांधले जावे, अशी आता ग्रामस्थांची इच्छा आहे.

हे ही वाचा…कट्टरतावादाला चिथावणीचा प्रयत्न, पोलीस त्यांचे काम करेलच, मात्र तोपर्यंत गुंडगिरी नाही पण आत्मसंरक्षण करा, सरसंघचालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील एकमेव मंदिर

अकोला जिल्ह्यातील सांगोळा येथे सद्गुणांमुळे रावणाची पूजा करण्यात येते. या ठिकाणचे मंदिर राज्यातील एकमेव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विदर्भातील काही आदिवासी भागात देखील रावणाला पूजले जाते.