चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोर झोन) ‘टी ११४’ ही वाघीण रस्त्यावर आली असता जिप्सी वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली. वाघिण वाहनाच्या गर्दीत पूर्णतः अडकल्याने वाघिणीच्या भ्रमणमार्गांत अडथळा निर्माण झाला. या प्रकारामुळे ताडोबातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याप्रकरणी ताडोबा प्रशासनाने २५ जिप्सी चालक व मार्गदर्शकांवर कारवाई केली. त्यानंतर आता जिप्सींना ‘रिव्हर्स’ आणि ‘यू-टर्न’ घेण्यावर बंदी घातली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक, पर्यटन वाहन चालक आणि पर्यटक मार्गदर्शकांचा आततायीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोर झोन) ‘टी ११४’ वाघीण रस्त्यावर आली असता वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून ताडोबा व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर वन्यजीवप्रेमींकडून टीका होत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात पर्यटन सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार विस्तृत नियम व कायदे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, या घटनेत वाहन चालक, मार्गदर्शक आणि पर्यटकांनी या नियमांची पायमल्ली केल्याचे आणि वाघासोबतच आपलाही जीव धोक्यात घातल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पर्यटक वाहनांमध्ये ही वाघीण पूर्णत: अडकली होती. तिच्या देहबोलीवरून ती अस्वस्थ आणि घाबरलेली असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान या घटनेनंतर ताडोबा व्यवस्थापनाने वाघिणीची वाट रोखून धरणाऱ्या दहा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या वाहनांवरील पर्यटक मार्गदर्शकांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, तर चालकांवर कायमची बंदी लादण्यात आली आहे. प्रत्येक वाहनावर तीन हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ताडोबातील जिप्सीसाठी नवा नियम जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागांची पाहणी; पश्चिम विदर्भासाठी यशोमती ठाकूर…

नवे नियम कोणते?

ताडोबात जिप्सींना ‘रिव्हर्स’ आणि ‘यू-टर्न’ घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिप्सींना एका रस्त्यावरून समोर जावे लागणार आहे. तसेच जिप्सी मागे घेता येणार नसल्याचे ताडोबा बफरचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांनी सांगितले. जिप्सी चालक व मार्गदर्शक अशा प्रकारचे कृत्य करतांना दिसून आल्यास त्यांचेवर कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे पर्यटकांकडून जिप्सी चालक व मार्गदर्शक यांना पैशाचे आमिष दाखविले जाते. त्यातूनच हा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा अशा पर्यटकांवर देखील कारवाई अपेक्षित आहे अशी मागणी वन्यजीव अभ्यासक व प्रेमींकडून केली जात आहे.