बुलढाणा : महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीमधील संभाव्य युतीची शक्यता मावळली असतानाच आज जिल्हा वंचितची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत, ‘युवानेते सुजात आंबेडकर यांना बुलढाण्यातून लढवावे अथवा स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात यावी,’ असा ठराव एकमताने पारित करण्यात आला.

वंचितचे जिल्ह्यातील एक प्रमुख केंद्र असलेल्या बुलढाणा शहरानजीकच्या एका ‘निवांत’ ठिकाणी ही जिल्हास्तरीय बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात काटेकोर गुप्तता पाळण्यात आली. यामुळे बैठकीचा विस्तृत तपशील कळू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. संघटनात्मक आढावा घेण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकीसंदर्भात तयारीचा आढावा व पुढील नियोजन करण्यात आले. बुलढाणा लोकसभेची जागा ही प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी लढवावी असा ठराव घेण्यात आला.

हेही वाचा >>>देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई’

तसे शक्य न झाल्यास वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. बैठकीला बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, यासंदर्भात जिल्हा संघटक बाला राऊत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी घेण्यात आलेल्या ठरावाची पुष्टी केली. तसेच हा ठराव बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठविल्याचे स्पष्ट केले.