भंडारा : एखाद्या रहस्यमय किंवा भयपटाचे कथानक वाटावे असा एक प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर येताच चर्चांना उधाण आले. तालुक्यात बिनाखी गावातील कैलास गौतम यांचे कुटुंबीय मागील आठ दिवसांपासून दहशतीत होते. घरातील साहित्य रहस्यमयरीत्या फेकले जाणे, अचानक भांडी पडणे, बंद गॅस शेगडी सुरू होणे आदी प्रकारामुळे हे कुटुंब चांगलेच धास्तावले होते.
विशेष म्हणजे गौतमच्याच खोलीत शेजारी असणारे भावाचे घर सुरक्षित होते. फक्त कैलास गौतमच्या खोलीत हा प्रकार सुरू होता. यामुळे या रहस्यमय प्रकाराचा उलगडा करणे महत्त्वाचे झाले होते. या रहस्यमय प्रकारावर कुणाचाही विश्वास नव्हता मात्र साहित्य अस्ताव्यस्त होत असल्याचा अनुभव आपल्याला आल्याचे येथील उपसरपंच राजेंद्र बघेले यांनी म्हटले आहे.
कुटुंबीयांनी सांगीतले की, सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर हा प्रकार वाढला. साहित्य फेकताना कुणी दिसत नसले तरी जमिनीवर पडताच आवाज येतो. कैलासच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. तीन खोल्यांच्या या घरात तिन्ही भावंडांचे कुटुंबीय राहतात. यातील एका भावंडाचे कुटुंब हे तिरोडा शहरात वास्तव्यास आहे. तर दुसरे भाऊ संजय गौतम हे दुसऱ्या खोलीत वास्तव्यास आहे. तिसऱ्या खोलीत कैलास गौतमचे कुटुंब वास्तव्यास आहे. गेल्या आठ दिवसांपासून कैलासच्या खोलीतील साहित्य अस्ताव्यस्त फेकले जात असल्याचे सांगितले जात होते. सकाळी सुरू होणारा हा प्रकार रात्री १० वाजेपर्यंत सुरू असायचा. कपाटाचे काच रहस्यमयरीत्या फोडले जायचे. अचानक ग्लास अथवा भांडी पडण्याचा आवाज यायचा, परंतु ते पडताना दिसत नव्हते. गॅस बंद केल्यानंतर अचानक सुरू होत असे. मुलाचे बसचे पास रहस्यमयरीत्या जळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला उलगडा
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गौतम यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. तब्बल दोन तास पदाधिकाऱ्यांनी गौतम यांच्या घरात ठिय्या मांडल्यानंतर ना गॅस सुरु झाला ना भांडे पडल्याचा अनुभव आला आहे, भानामती व जादूटोणा असे कुठलेही प्रकार नसल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष किशोर बोदरे यांनी सांगितले.
गावकऱ्यांची घटनास्थळी गर्दी
या रहस्यमय प्रकाराचा उलगडा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी आणि पोलीस विभाग आले असल्याचे कळताच गावकऱ्यांची उत्सुकता वाढली होती. शेजारी असलेल्या गावातील नागरीक गोळा झाले होते. राष्ट्रीय महामार्गावरही नागरिकांची गर्दी झाली. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली.
कैलास गौतम यांच्या घरी आम्ही पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. स्थितीचा आढावा घेतला. दोन तास थांबल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नाही. कुटुंबियांत जनजागृती करण्यात आली. भानामती, जादूटोणा, भूत असे कुठलेही प्रकार नाहीत. अशा चर्चावर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये.- राहुल डोंगरे, तालुका संघटक, अंनिस