नागपूर : करोनानंतर दोन वर्षांनी १०८व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला मिळाले असून जोरदार तयारीही सुरू आहे. मात्र, चीननंतर आता विविध देशांमध्ये पुन्हा करोना वाढल्याने प्रशासनाला धडकी भरली आहे. ३ ते ७ जानेवारीला होणाऱ्या या परिषदेसाठी देश-विदेशातील पंधरा हजारांवर मान्यवर दाखल होणार आहेत. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. मात्र, करोना रुग्णांची संख्या वाढल्यास ‘इंडियन सायन्स काँग्रेस’च्या तारखेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा >>> अमरावतीत राज्यपालांच्या वाहनाच्या ताफ्याला शिवसैनिकांनी दाखवल्या चपला
बैठक व्यवस्था, मनुष्यबळ उपलब्धता, पायाभूत सुविधा व पाणीपुरवठा या संदर्भात तयारी सुरू आहे. कृषी, वने, प्राणी, मत्स्य, पशुशास्त्र, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र पर्यावरण माहिती तंत्रज्ञान, पदार्थ विज्ञान, सांख्यिकी, वैद्यकीय विज्ञान, नवीन जीवशास्त्र अशा १४ विविध विभागांवर नवनवीन शोध प्रबंध, भव्य प्रदर्शनी, मार्गदर्शन आणि यामध्ये तज्ज्ञांचा सहभाग, अशी या संमेलनाची व्यापकता राहणार आहे. मात्र, करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. अशा भीतीयुक्त वातावरणात दहा दिवसांवर आलेल्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’वर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिषदेमध्ये पंधरा हजारांवर मान्यवर आणि विद्यार्थी सहभागी होतात. त्यामुळे करोनाचा प्रसार होण्याची शक्यता असते. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.