लोकसत्ता टीम

नागपूर : शहरात पिस्तूलाचा वापर आणि गोळीबार होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी चक्क सकाळीच ड्रग्स तस्करांच्या दोन टोळ्या एकमेकांसमोर आल्या. सीताबर्डीसारख्या परीसरात एका टोळीतील सदस्याने दुसऱ्या टोळीवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक गुन्हेगार गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे सीताबर्डी परीसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेला गुन्हेगार जैनुअल कुरेशी याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक जीवंत काडतूस आणि काडतूसचा रिकामा खोका जप्त केला.

शहरात गेल्या काही दिवसांपासून पिस्तूलाची खरेदी विक्री वाढली असून अनेक छोटे-मोठे गुन्हेगार पिस्तूलाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. तसेच एमडी तस्करांच्या टोळ्यांचीही संख्या वाढली आहे. मृणाल गजभीये (३०, आनंदनगर) नावाच्या गुन्हेगाराला २०२१ मध्ये ड्रग्स विक्रीच्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. सध्या तो जामीनावर तुरुंगाबाहेर आहे. त्याची ड्रग्सविक्री करणारी टोळी आहे. जुनैअल कुरेशी हा सुद्धा ड्रग्सच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तोसुद्धा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटून आला आहे. कुरेशीचे मृणालकडे एमडी विक्रीतील काही पैसे बाकी होते, तो पैशाची मागणी करीत होता. कुरेशीने मृणालला फोन करून पैशासाठी घरी येत असल्याचे सांगितले. दरम्यान मृणालने अन्य साथिदार नितीन गुप्ता, गोलू गोंडाणे, समिर दुधनकर यांच्यासह घरासमोर थांबला. कुरेशी आल्यानंतर त्यांच्यात पैशावरून वाद झाला. यादरम्यान, टोळीवर अचानक गोळीबार झाला. यामध्ये कुरेशीच्या पोटात गोळी घुसली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृणाल गजभीये आणि नितीन गुप्तासह चौघांनी ताब्यात घेतले. मात्र, गोळीबार कुणी केला, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही.

आणखी वाचा-नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या

अंधाधुंद गोळीबारात कुरेशी गंभीर जखमी झाला. त्याच्या पोटात गोळी घुसली. त्याला मित्रांनी मेयोत दाखल केले. डॉक्टरांनी सीताबर्डी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. तोपर्यंत ही घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंधाधुंद गोळीबार झाल्यानंतरही सीताबर्डी पोलिसांना माहिती नव्हती. त्यावरून पोलीस सुरक्षेसाठी किती गंभीर आहेत, याचा अंदाज येते.

दोन गुन्हेगार कारागृहातून सुटून आल्यावर चौकात अंधाधुंद गोळीबार करतात. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन दहशत पसरते. परंतु, वसुलीवर भर देणारे गुन्हे शाखेचे पथक आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यातील डीबी आणि गोपनीय पथक साखर झोपेत होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात ठाणेदार आसाराम चोरमाले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.