लोकसत्ता टीम

नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्याकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्नित परिचर्या महाविद्यालयातील बी. एस्सी. नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीने वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ऋतुजा बागडे (१९) रा. भंडारा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ऋतुजा ही मेडिकलमधील बी. एस्सी. नर्सिंगच्या प्रथम वर्षाला होती. तिची पहिल्या सत्राची परीक्षा नुकतीच झाली व आता जूनमध्ये दुसऱ्या सत्राची परीक्षा होणार होती. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी नियमित गणनेच्यावेळी ती हजर झाली नाही. त्यामुळे अन्य विद्यार्थिनी तिला बोलवायला तिच्या खोलीकडे गेल्या. त्यावेळी दार आतून लावलेले होते. आवाज देऊनही प्रतिसाद नसल्याने काही विद्यार्थिनींनी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी ऋतुजाला खोलीत गळफास लागलेल्या स्थितीत पाहून त्यांना धक्काच बसला.

आणखी वाचा-नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

मुलींनी आरडा- ओरड केल्याने वसतिगृहातील विद्यार्थी तिथे गोळा झाले. ही माहिती कळताच परिचर्या आणि मेडिकल महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे धाव घेतली. अंजनी पोलिसांना माहिती मिळताच तेही तिथे पोहचले. पंचनामकरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. यावेळी मुलीच्या नातेवाईकांनाही माहिती दिली गेली. नातेवाईक पोहचल्यावर शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या सुपूर्द केले गेले. त्यानंतर पार्थिव सायंकाळी तिच्या मूळ गावी नेण्यात आले.