शिकवणी वर्ग बंद असल्याचा फटका

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : खासगी शिकवणी घेणाऱ्या संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार केले आहेत. यासाठी कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे. मात्र, टाळेबंदीमुळे शिकवणी वर्गासह हे वसतिगृहही बंद असल्याने या संस्थांची कोटय़वधींची गुंतवणूक धोक्यात आली आहे. वसतिगृह केव्हा सुरू होतील हे अनिश्चित असल्याने आपल्या गुंतवणुकीचे काय होणार, असा प्रश्न शिकवणी वर्ग संचालकांना पडला आहे.

उपराजधानी हे खासगी शिकवणी वर्गाचे प्रमुख केंद्र झाले आहे. त्यामुळे येथील शिकवणीसाठी विदर्भासह नजीकच्या मध्यप्रदेश, छत्तीगड, आंध्रप्रदेश आदी राज्यांतील विद्यार्थीही प्राधान्य देतात. यात विशेषत: जेईई, नीट परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी लावणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या असते. आयआयटी आणि वैद्यकीय शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा अधिकचा कल असल्याने इयत्ता अकरावी आणि बारावी अशा दोन वर्षांसाठी खासगी शिकवणीत प्रवेश घेतला जातो. देशपातळीवर प्रसिद्ध अशा सर्वच खासगी शिकवणी संस्था शहरात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शिकवणी वर्गामधील स्पर्धाही तेवढीच वाढली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देऊन प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर शिकवणी वर्गाचा भर असतो. त्यासाठी इतर शहरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय म्हणून शिकवणी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध भागांमध्ये खासगी वसतिगृहे तयार केली आहेत. या वसतिगृहांमध्ये अनेक संस्थांनी कोटय़वधींची गुंवणूक केली आहे.

वसतिगृह सुरू होणार की नाही?

टाळेबंदी उठली तरी सामाजिक अंतर किती दिवस पाळावे लागतील हे अनिश्चित आहे. त्यामुळे सामाजिक अंतराच्या भीतीनेही अनेक पालक हे आपल्या पाल्यांना वसतिगृहांमध्ये पाठवतील काय, हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे टाळेबंदी उठली तरी वसतिगृहांचा व्यवसाय बुडण्याची शक्यताच धूसर असल्याने अशा संस्थांचे आर्थिक संकट गडद होणार आहे.

एका वसतिगृहाची ७० लाखांची उलाढाल

नामवंत शिकवणी वर्गाच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वर्षांकाठी किमान ६० ते ७० हजारांचे शुल्क आकारले जाते. एक वसतिगृहात किमान एक हजार विद्यार्थी असे समीकरण मांडल्यास एका वसतिगृहाचा व्यवसाय हा ६० ते ७० लाखांच्या घरात असतो. त्यामुळे वसतिगृह हा नफ्याचा व्यवसाय असल्याने खासगी शिकवणीकडून वसतिगृहांमध्ये मोठी गुंवणूक केली जाते. मात्र, या गुंतवणुकीवर करोनाचे संकट कोसळल्याने खासगी शिकवणी संस्थांचा व्यवसाय बुडाला आहे.

वसतिगृह चालक, कामगारांचा रोजगार बुडाला

काही खासगी शिकवणी वर्गाकडे स्वत:चे वसतिगृह नसल्याने येथील विद्यार्थी इतर खासगी वसतिगृहांमध्ये राहतात. या खासगी वसतिगृहांसाठी लाखोंची गुंतवणूक केली जाते. मात्र, आता त्या गुंतवणूकीचे काय? असा प्रश्न पडला आहे. यासह वसतिगृहांमध्ये काम करणारे सुरक्षारक्षक, विद्यार्थ्यांना जेवण पुरवणाऱ्या खानावळीमध्ये काम करणारे कामगार या सर्वाच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.