अमरावती : भीष्मक राजा यांची कन्या रुक्मिणी अमरावती येथील अंबादेवीच्या दर्शनासाठी आल्या असताना भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे हरण केले, अशी आख्यायिका आहे. पण या मंदिरासोबतच स्थानिक माताखिडकी परिसरातील पुरातन श्रीकृष्ण मंदिराचेही नाते आहे. या मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी नामस्मरणाने विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. पारायण, देवास मंगलस्नान व उटी तसेच उपाहाराचा कार्यक्रम आटोपला. त्यानंतर रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मंदिरांची फुले, तोरण, विजेच्या दिव्यांच्या माळा, विविध वस्तूंनी सजावट करण्यात आली आहे.
माता खिडकी या परिसरातील हे मंदिर पुरातन आहे. राजस्थानी शैलीत धौलपुरी गुलाबी दगडांमध्ये श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. जन्माष्टमीला महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून आलेल्या भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. आख्यायिकेनुसार कौंडण्यपूर माहेर असलेल्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी निश्चित झाला होता. परंतु रुक्मिणीला त्याच्याशी विवाह करावयाचा नव्हता.
तिने मनोमन भगवान श्रीकृष्णाशी विवाह करण्याचे ठरविले होते. तिकडे श्रीकृष्णानेदेखील रुक्मिणीच्या निस्सीम प्रेमामुळे तिच्याशीच विवाह करण्याचा निश्चय केला होता. रुक्मिणीने आपला विचार एका पत्रात लिहून श्रीकृष्णास प्रार्थनापूर्वक कळविला. शिशुपालाशी ठरलेल्या विवाहाच्या एक दिवस आधी कुळाच्या रितीरिवाजानुसार नियोजित वधू म्हणून जेव्हा मी अंबादेवीच्या दर्शनास जाईल तेव्हा आपण मला घेऊन जावे, असा प्रस्ताव रुक्मिणीने त्या पत्रात ठेवला होता. माताखिडकी (बुधवारा) येथील मंदिरात भगवान श्रीकृष्णाचा तीन दिवस मुक्काम होता. ठरल्यानुसार रुक्मिणी अंबादेवीचे दर्शनास आली तेव्हा तेथून तिचे श्रीकृष्णांनी हरण केले, अशी आख्यायिका आहे.
श्रीकृष्णांचा त्यावेळी याच ठिकाणी मुक्काम झाल्यामुळे हे मंदिर श्रीकृष्ण चरणांकित आहे. नेहमीच भाविकांची येथे गर्दी असते. जन्माष्टमीला जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशातील विविध भागातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. परकाटोच्या (तटबंदी) आत भोलेश्वर मंदिर आहे. हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान मानले जाते. माता-खिडकी परिसरातील महानुभाव मंदिराबद्दल असे म्हटले जाते की, भगवान श्रीकृष्ण स्वतः येथे आले होते. भगवान श्रीकृष्णाच्या चरणांचा स्पर्श झालेल्या ठिकाणी महानुभाव मंदिराची स्थापना झाली. भोलेश्वर मंदिर येथून काही अंतरावर आहे. या मंदिराखाली बांधलेल्या प्राचीन विहिरीचेही वेगळे वैशिष्ट्य आहे. भगवान श्रीकृष्णांसोबत आलेले अश्व दगडांपासून बनवलेल्या विहिरीत पाणी पिण्यासाठी येत असत, असे म्हटले जाते. या परिसरात अनेक पुरातन मंदिरे आहेत.