scorecardresearch

कौशल्य असूनही नोकरी मिळेना; सात वर्षांत देशभरात प्रशिक्षितांपैकी निम्मे तरुण बेरोजगार

तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत सात वर्षांत कौशल्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या देशातील एकूण प्रशिक्षित तरुणांपैकी निम्म्याच तरुणांना रोजगार उपलब्ध झाला.

कौशल्य असूनही नोकरी मिळेना; सात वर्षांत देशभरात प्रशिक्षितांपैकी निम्मे तरुण बेरोजगार
प्रतिनिधिक छायाचित्र

चंद्रशेखर बोबडे

नागपूर : तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान कौशल्य विकास योजनेत सात वर्षांत कौशल्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या देशातील एकूण प्रशिक्षित तरुणांपैकी निम्म्याच तरुणांना रोजगार उपलब्ध झाला.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाकडून प्राप्त माहितीनुसार, २०१५ पासून ही योजना सुरू झाली. तेव्हापासून ३० जून २०२२ पर्यंत या योजनेतील अल्पकाळ प्रशिक्षण गटातून देशात एकूण ७०.७५ लाख तरुणांनी प्रशिक्षण घेतले. त्यापैकी २४.१६ लाख तरुणांना विविध खासगी किंवा सार्वजनिक संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळाली.

महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण ३ लाख ५३ हजार ६०२ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यापैकी ८० हजार ८०५ उमेदवारांना नियुक्त्या मिळाल्या. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवारांच्या नियुक्त्या किमान वेतन किंवा त्याहून अधिक वेतन देणाऱ्या कंपन्यांमध्ये केल्या जात असल्याचा दावा या विभागाकडून करण्यात आला आहे.

उमेदवारांना दोन प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ते पूर्ण केल्यावर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते. उमेदवारांना नियुक्तीच्या संधी मिळाव्या म्हणून जिल्हास्तरावर रोजगार मेळावे घेतले जातात. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रशिक्षित तरुण यात सहभागी होतात. कंपन्यांना आवश्यक प्रशिक्षित तरुणांची निवड केली जाते. या योजनेत महिलांनाही प्रशिक्षण दिले जाते. 

थोडी माहिती..

तरुणांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे व त्यातून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करणे हा या याजनेचा उद्देश आहे.  देशभरात २०१५ पासून एकूण १९ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आली. यात निरनिराळी कौशल्ये प्राप्त करूनही निम्म्याच प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी लाभली.

योजनेचा लेखाजोखा

प्रदेश   प्रशिक्षित तरुण नियुक्त्या

देश ७०.७५ लाख २४.१६ लाख

महाराष्ट्र ३.०५ लाख  ८० हजार ८०५

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या