अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक यंदा परभणी येथे घेण्यात आली. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ११ पीक वाणांसह नऊ यंत्रे व अवजारे आणि ६९ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारसींना मान्यता देण्यात आली. हे संशोधन याच हंगामापासून अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
परभणी येथे संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक झाली. या बैठकीत चारही कृषी विद्यापीठांचे २५ पीक वाण, १८ यंत्रे व अवजारे, २२५ उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञानांना मंजुरी मिळाली. यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आपले वर्चस्व कायम राखत विविध तांत्रिक सत्रांमध्ये संशोधनात्मक सादरीकरण केले. अकोला कृषी विद्यापीठाच्या ११ पीक वाणांसह नऊ यंत्रे व अवजारे आणि ६९ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारसींना मान्यता मिळाली.
यामध्ये ज्वारीचे पीडीकेव्ही शाश्वत टीएकेएस-४६१, नाचणीचे पीडीकेव्ही आदिश्री बीएफएम८-ई, मूगाचे पीडीकेव्ही वर्षा टीएकेएम १४१, खरीप मूग पीडीकेव्ही फाल्गुनी टीएकेएम १४०, हरभराचे काबुली एकेजीके १८०१, जवस पीडीकेव्ही एनएल ३७१, खिरणी एमजीके-३१ पीडिकेव्ही आधार, सीताफळाचे पीडीकेव्ही संगम सीए १२-०३, गहू एकेएडब्ल्यू ५१००, मका संकरीत वाण पीडीकेव्ही आरंभ बीएमएच १८-२, ज्वारीचे सीएसव्ही ६५ येलो या पीक वाणाला मंजुरी मिळाली. संशोधित यंत्र व अवजारांमध्ये सोयाबीन कापणी यंत्र, मळणी यंत्र, मशागत धान टोकन यंत्र, बायोमास डिस्टीलेशन प्रणाली, प्राणी प्रतिबंधक तथा सौर पीक सापळा, गांडूळ खत पसरविणारे यंत्र, धान्य सफाई व प्रतवारी यंत्र, मिनी बेसन मील व फिरते सोयाबीन ड्रायरला मंजुरी दिली. ‘डॉ. पं.दे.कृ.वि.’च्या एकूण ६९ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारसींना देखील बैठकीत मंजुरी देण्यात आली.
संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शनात, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांचे नेतृत्वात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी संकल्पनेसाठी संशोधन सादर केले. कृषी विद्यापीठाद्वारे संशोधित उच्च प्रतीचे बियाणे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापरातून सिद्ध झालेले शेतीपयोगी यंत्रे-अवजारे तथा शेती तंत्रज्ञान शिफारसींचा वापर अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने यंदाच्या खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.