सहसंचालक डॉ. साळुंखेंच्या धक्कादायक उत्तरावर अध्यापक संघटनेचा आक्षेप

नागपूर : नागपूरच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे हे विविध कामांसाठी प्राध्यापकांसोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करीत असल्याचा आरोप फुले, शाहू, आंबेडकर अध्यापक परिषदेने केला आहे. विशेष म्हणजे, मी या खुर्चीवर प्राध्यापकांचे काम करण्यासाठी बसलो आहे. मात्र, अनेकदा इच्छा नसतानाही वरपर्यंत रक्कम पोहचावी लागत असल्याने आपल्याला पैसे घ्यावे लागत असल्याचे अजब उत्तर डॉ. साळुंखे यांनी दिल्याचा आरोपही या परिषदेने केला आहे.

नागपूर विभागात सहा जिल्ह्यांचा समावेश असून सातशेहून अधिक महाविद्यालयांमधील प्राध्यापकांचा समावेश आहे. येथील प्राध्यापकांची स्थाननिश्चिती, वेतनवाढ, वेतनश्रेणी आदींसाठी प्राध्यापकांना उच्च शिक्षण सहसंचालकांकडे अर्ज करावा लागतो. सध्या शासकीय विज्ञान संस्थेतील प्राध्यापक डॉ. महेशकुमार साळुंखे यांच्याकडे सहसंचालक पदाचा प्रभार आहे. मात्र, डॉ. साळुंखे यांच्याकडे स्थाननिश्चितीसाठी अर्ज केला असता प्राध्यापकांना आर्थिक देवाणघेवाण करावी लागत असल्याची तक्रार संघटनेने केली आहे. प्राध्यापकांच्या तक्रारींचा मागोवा घेण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर अध्यापक परिषदेने सर्वेक्षण केले असून यामध्ये डॉ. साळुंखे देवाणघेवाण करत असल्यावर शिक्कामोर्बत झाल्याचा आरोप आहे.  अध्यापक परिषदेच्या आरोपानुसार, डॉ. साळुंखे यांनी पहिल्या स्थाननिश्चितीसाठी वीस हजार, दुसऱ्या व तिसऱ्यासाठी तीस हजार व प्रोफेसरसाठी पन्नास हजार रुपये रक्कम ठरवलेली आहे. प्राध्यापक जेव्हा सहसंचालकांकडे फाईल घेऊन जातात तेव्हा पहिल्या भेटीत त्रुटी काढल्या जातात. दुसऱ्या भेटीत सरळ बोलणी करतात, मला वरपर्यंत रक्कम पोहोचवावी लागते. त्यामुळे इच्छा नसूनही हे करणे भाग आहे, असे सांगितले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यापर्यंत पैसा पुरवला जातो असे कळल्याचा आरोपही अध्यापक परिषदेने केला आहे. या आरोपांमुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

म्हणे, ‘पैसा देणे गैर नाही’

नागपूरच्या सहसंचालकांकडे काही प्राध्यापक गेले असता टाळेबंदीमध्ये काही राज्यातील शासकीय महाविद्यालयीन प्राध्यापकांचे वेतन त्या राज्यांनी अर्धे दिले. मात्र, आपल्या राज्याने पूर्ण वेतन दिले. त्यामुळे पैसा देणे गैर नाही, असा युक्तिवाद करून सहसंचालकांकडून भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण केले जात असल्याचा आरोप फुले, शाहू, आंबेडकर अध्यापक परिषदेने केला आहे.

आमच्या कार्यालयात कुठलाही गैरप्रकार होत नाही. ज्यांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली नाही त्यांची स्थाननिश्चिती रखडली आहे. अशी मंडळी शैक्षणिक अर्हता पूर्ण नसतानाही स्थाननिश्चितीसाठी दबाव आणतात. शेवटी काम न केल्यास असे आरोप करतात. – डॉ. महेशकुमार साळुंखे, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण.