हेडगेवारांचा जयंती समारंभ इंग्रजी दिनदर्शिकेनुसार
आतापर्यंत हिंदूतिथीनुसारच म्हणजे गुडीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती साजरी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा प्रथमच ती इंग्रजी दिनदर्शिकेनुसार म्हणजे १ एप्रिल रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानिमित्त नागपूर येथील हेडगेवार यांच्या निवासस्थानी कार्यक्रमही आयोजित केला आहे. संघातील बदलाची प्रक्रिया ही फक्त गणवेश बदलापर्यंतच मर्यादित नाही तर हा बदल व्यावहारिक पातळीवरही दिसून येत असल्याच स्पष्ट होत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या स्वदेशी जागरण मंचने १ एप्रिलपासून आर्थिक नववर्ष स्वागत दिन व डॉ. हेडगेवार जयंती समारंभ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या दिवशी नागपुरातील महालमधील हेडगेवार यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात संघाशी संबंधित संघटना सहभागी होतील. संघाने या कार्यक्रमासाठी निवडलेली १ एप्रिल ही तारीख संघातील बदलाची व्याप्ती दर्शविणारीआहे. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षांला सुरुवात होते. संघाला ही संकल्पना मान्य नाही. त्यांच्यादृष्टीने नवीन वर्ष हे गुडीपाडव्यापासूनच सुरू होते.