कविश्रेष्ठ कालिदासांच्या स्मृतीचा जागर करणारा कालिदास महोत्सव २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. गायन, वादन, नृत्य, पर्यटन चित्र प्रदर्शन, परिसंवाद आदी विषयांचा संगम असलेला हा महोत्सव यावर्षी नव्या पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रामटेकमधील कालिदास स्मारक परिसरात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे.
या महोत्सवाची माहिती देताना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले, या महोत्सवाचे उद्घाटन रामटेकमध्ये होणार असले तरी उर्वरित संगीत कार्यक्रम, पर्यटन चित्र प्रदर्शन आणि परिसंवाद वसंतराव देशपांडे सभागृह आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र परिसरात होणार आहेत. उद्घाटनाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाणे, आमदार मलिल्कार्जुन रेड्डी, माजी आमदार आशिष जयस्वाल, आनंदराव देशमुख, पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात २१ ते २४ नोव्हेंबर दरमयान पूर्व विदर्भ पर्यटन प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत या महोत्सवात हिंदुस्थानी शास्त्रीय वाद्यसंगीतामध्ये तीन पिढय़ांचे व्हायोलिन वादन होणार आहे. त्यात ज्येष्ठ व्हायोलिनवादक एन. राजम, संगीता शंकर आणि रागिणी शंकर सहभागी होतील. पं. बिरजू महाराजांचे शिष्य पं. सौरव आणि गौरव मिश्रा यांचे कथक नृत्य, मालिनी अवस्थी यांचे उपशास्त्रीय गायन होणार आहे. रिता भादुजी यांचे मेंडोलिन वादन, डॉ. राजा व राधा रेड्डी यांचे कुचीपुडी नृत्य, गिरीजादेवी यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, अमान अली खान आणि अयान अली खान यांचे सरोद वादन जुगलबंदी, सुचेता भिडे- चाफेकर यांचे भरतनाटय़म, आणि पं. उल्हास कशाळकर व समीहन कशाळकर यांचे शास्त्रीय गायन आदी संगीतमय कार्यक्रम सादर होतील. २३ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे ‘नमामी गंगे’ या स्वच्छ भारत अभियानावर आधारित सीडीचे लोकार्पण होणार आहे. या महोत्सवात संस्कृत विद्यापीठातर्फे ‘अष्टपैलू कालिदास’ या विषयावर केंद्राच्या परिसरात राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
देशाच्या सांस्कृतिक नकाशावर कालिदास समारोह पुनरुज्जीवित करणे, विदर्भाची विशेषत: नागपूरची राज्य आणि देशपातळीवर प्रमुख पर्यटनस्थळ अशी प्रतिमा वृद्धिंगत करणे, नागपूरच्या समृद्ध इतिहासाकडे येथील ऐतिहासिक सांस्कृतिक व वाङ्मयीन वारशाकडे लोकांचे लक्ष वेधणे , पर्यटन व्यवसाय निर्वाहाचे साधन म्हणून विकसित करणे आणि सेवा क्षेत्रातील एक महत्त्वाचा उद्योग म्हणून विदर्भातील पर्यटनाची विविध संस्था क्रीडापटूंशी सांगड घालून चालना देणे हा उद्देश ठेवून समारोह आयोजित करण्यात आला आहे.
चीनचे शिष्टमंडळ आमंत्रित
सांस्कृतिक आदान-प्रदान अंतर्गत भारतात आलेल्या चीनच्या शिष्टमंडळाला या महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनाचे मुंबई येथील महावाणिज्यदूत झेंग जुआन यांच्या नेतृत्वाखाली लि फॅग हुई यांच्या समवेत १५ सदस्यीय शिष्टमंडळ २२ व २३ नोव्हेंबरला महोत्सवात उपस्थित राहणार आहे.