झटपट पैसा कमविण्यासाठी एका निरागस मुलालाही संपविले
केवळ झटपट पैसा मिळवण्याच्या प्रयत्नात कोवळ्या कुश कटारियाचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आयुष पुगलियाचाही शेवट केवळ सहा वर्षांतच त्याच पद्धतीने झाला.
फेसबुकवर भेटलेल्या मैत्रिणीला तिच्या वाढदिवशी महागडी भेटवस्तू देऊन खुश करण्यासाठी व झटपट पैसा कमवण्याच्या उद्देशाने आयुष पुगलियाने (२७) आठ वर्षीय कुश कटारियाचे अपहरण करून ११ ऑक्टोबर २०११ ला निर्दयीपणे हत्या केली होती. त्यानंतर सहा वर्षांने सोमवारी कारागृहात सूरज विशेषराव कोटनाके (२४) रा. गडचांदूर या कैद्याने त्याची हत्या केली.
२०११ मध्ये आयुष पुगलियाला बंगळुरू येथील एक तरुणी फेसबुकवर भेटली. त्यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि तो तिला विमानाने बंगळुरू येथे जाऊन भेटू लागला. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ती मुलगी एका कंपनीत काम करीत होती, तर तिने कुठेही काम करू नये, असे आयुषला वाटत होते. ऑक्टोबर महिन्यात तिचा वाढदिवस असल्याने त्या दिवशी तिला महागडी भेटवस्तू देऊन खुश करायचे होते. शिवाय तिला कायमचे आपलेसे करण्यासाठी व कर्ज फेडण्यासाठी त्याने कुशचे अपहरण केले. २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, कटारिया कुटुंबीयांनी पोलिसांना कळविल्याने ११ ऑक्टोबर २०११ ला कुशचा निर्घृण खून केला. या प्रकरणात पोलिसांनी आयुषला अटक केली. आयुषच्या मैत्रिणीने न्यायालयात साक्ष देऊन वरील माहिती दिली होती. या प्रकरणात त्याला तिहेरी जन्मठेप आणि कलम २०१ अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च २०१६ ला शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून तो कारागृहात होता.
पूर्वनियोजित कटातून खून -भावांचा आरोप
आयुषच्या खुनामुळे कटारिया कुटुंबाला आनंद मिळणार असून त्यांचा या खुनामागे हात असू शकतो. ही तात्काळ झालेल्या वादातून घडलेली घटना नसून पूर्वनियोजित कट रचून आपल्या भावाचा खून करण्यात आला. या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी नवीन पुगलिया आणि नितीन पुगलिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. शिवाय भावाच्या खुनाची बातमी आपल्याला प्रसारमाध्यमांतून मिळाली. कारागृह प्रशासनाने दुपारी १ वाजता अधिकृत माहिती दिली. दिवसभर भावंडांना आतमध्ये घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी कारागृहाच्या प्रवेशद्वारावर बसून पोलीस अधिकाऱ्यांची वाहने अडवण्याचा प्रयत्न केला. भावाचा खून त्याच्यापासून का लपविण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
घटनाक्रम
११ ऑक्टोबर २०११ – कुशचे अपहरण
१३ ऑक्टोबर २०११ – संशयावरून आयुष पुगलियाला अटक
१५ ऑक्टोबर २०११ – कुशचा मृतदेह आढळला
४ एप्रिल २०१३ – जिल्हा न्यायालयात दुहेरी जन्मठेप
२२ जून २०१५ – उच्च न्यायालयात तिहेरी जन्मठेप
११ मार्च २०१६ – सर्वोच्च न्यायालयातही तिहेरी जन्मठेप कायम
११ सप्टेबर २०१७ – आयुषची कारागृहात हत्या
न्यायदंडाधिकाऱ्यांसाठी सर्व ताटकळत
सकाळी ८.३० वाजतापासून धंतोली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी कारागृहात पोहोचले. त्याशिवाय परिमंडळ-२ चे उपायुक्त राकेश ओला, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे हेही कारागृहात पोहोचले. पोलिसांनी बराकीतील इतर कैद्यांची चौकशी केली. त्यावेळी सूरजने गुन्हा कबूल केला. त्यानंतर सर्व प्रक्रिया सुरू झाली. मात्र, कारागृहाच्या आतमध्ये एखाद्या कैद्याचा खून होणे ही गंभीर बाब असल्याने न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा व इतर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यायदंडाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, परंतु दुपारी ३ वाजता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए.ओ. जैन कारागृहात पोहोचले. तोपर्यंत पोलीस व कारागृह यंत्रणा ताटकळत होती. सायंकाळी ६ वाजता मृतदेह कारागृहाबाहेर काढण्यात आला. त्यामुळे सोमवारी शवविच्छेदन होऊ शकले नाही.