हजारो मजुरांनी मूळ गाव गाठल्याने उद्योजक हतबल;  कच्च्या मालाची आवकही बंदच

नागपूर : टाळेबंदीच्या काळात हाल होत असल्याने परप्रांतीय कामगारांनी पायपीट करत आपल्या गावाचा रस्ता धरला असून आता  रोजगारासाठी शहरात येण्यास नकार देणे सुरू केले आहे. मजुरांच्या या नकारसत्रादरम्यानच उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे उद्योजक मोठय़ा अडचणीत सापडले असून त्यांच्यावर आता कामगारांपुढे हात जोडण्याची वेळ आली आहे.

नागपुरात दोन मोठय़ा औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये बुटीबोरी ही पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून येथे नोंदणीकृत तीस हजार कामगार कामावर आहेत. त्यापैकी वीस हजार कामगार हे परप्रांतीय आहेत. िहगणा आणि कळमेश्वर असे मिळून वीस हजाराहून अधिक कामगार आहेत.  टाळेबंदमुळे सर्वच उद्योग बंद पडले. मजुरांनी काही दिवस कसेबसे काढले. मात्र त्यानंतर मदतही मिळणे बंद झाले. त्यामुळे ते पायी गावी निघाले. मात्र आता तब्बल दोन महिन्यानंतर महापालिकेच्या हद्दीबाहेर असलेले उद्योग सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र तोपर्यंत ६० टक्केहून अधिक कामगार आपल्या गावाकडे रवाना झाले. उरलेल्या कामगारांचीही  जाण्याची सोय सरकारने केल्याने ते देखील  गावाकडे निघाले आहेत. अशात विना कामगार उद्योग कसा सुरू करावा, अशी चिंता उद्योजकांना सतावत आहे. अनेक कारखान्यात कंत्राटी पद्धतीने कामगार पुरवण्यात येतात. त्यासाठी उद्योजक ठेकेदारांकडे सतत कामगारांची मागणी करीत आहेत.  ठेकेदारही कामगारांची समजूत काढत असून त्यांना परत कामावर येण्याची विनवणी करत आहेत. बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमध्ये ४५० कारखाने असून त्यापैकी ८० छोटे मोठे कारखाने सुरू झाले आहेत. तेथे कामगार आणि कर्मचारी यांना नागपुरातून ये-जा करण्यासाठी देखील अडचणीत येत आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या काही कारखान्यातील कामगारांची राहण्याची व्यवस्था उद्योजकांना बुटीबोरीत करावी लागत आहे. कर्मचारीवर्ग पन्नास टक्के असल्याने उत्पादनावरही परिणाम होत आहे. कच्च्या मालाची आवक बंद असल्याने अनेक कारखाने सुरू करुनही काही उपयोग नाही असेही उद्योजकांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामगारांना परत बोलावण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. परंतु बहूतांश कामगार आपल्या गावी पोहचले आहेत. अनेक राज्यात कारखाने बंद असल्याने कच्चा मालही मिळत नाही. त्यामुळे विना कामगार उद्योग कसा सुरू करावा हा मोठा प्रश्न सध्या सर्वाना भेडसावत आहे. सरकारने उद्योजकांसाठी एक खिडकी योजना सुरू केल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतात. सरकारला सर्वाधिक महसूल उद्योगक्षेत्रातून मिळतो हे सरकाने लक्षात घेणे गरजेचे आहे.

– प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफक्चर्स असोसिएशन.