बुलढाणा : मागील दोन-तीन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सिंदखेड राजा  तालुकाही याला अपवाद नसून संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आले. तलावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठा जमा झाला आहे.

  सिंदखेड राजा तालुक्यातील जांभोरा येथील शेतकरी सोपान बाबुराव खरात यांच्या शेताजवळ असलेल्या गट नंबर ५३ व ५४ मध्ये तलाव आहे. या तलावाच्या  परिसरात सतत मुसळधार पाऊस झाल्याने तलावातील पाण्याचा दाब जास्त वाढला. या परिणामी तलाव  फुटला, त्यामुळे खालच्या भागांमध्ये असलेल्या शेकडो एकर शेत जमिनीत  पाणी शिरले  . यामुळे   सोयाबीन, कपाशी,फळबाग, भाजीपाला यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तसेच सुपीक जमीन खरडून गेली आहे. गणेश खरात यांच्या सात एकर वरील भाजीपाल्या चे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान सिंचन विभागाने जेसीबी मशीनच्या मदतीने  तलावाचा फुटलेला भाग बुजविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने हा प्रयत्न असफल ठरला आहे.  सिंदखेड राजा तहसीलदार अजित दिवटे, किनगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक मोहन गीते, महसूल मंडळं अधिकारी, तलाठी आदि घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून आपद ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.  यामुळे शेकडो शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचा महापूर साचला आहे.   तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.