आ.आशीष देशमुख प्रकरणात सवाल; शिकारीत शौर्य कसले ; मुनगंटीवारांनी खडसावले
जंगली प्राण्यांपासून पीकहानी टळावी म्हणून त्यांना मारण्यासाठी काटोलचे भाजपचे आमदार डॉ.आशीष देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघात परवानाधारक बंदूकधाऱ्यांची नियुक्ती करून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणला असला तरी असे प्रतिनिधी नियुक्त करण्याचे अधिकार त्यांना आहेत काय, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काटोल मतदारसंघातील केदारपूर जंगलात केलेल्या नीलगायीच्या कथित शिकारीवरून सध्या देशमुख चर्चेत आले आहेत. मृत प्राण्यांसोबत हातात बंदूक घेऊन उभे असलेले देशमुखांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर आल्यावर ही बाब उघड झाली.

वरवर पाहता ही बाब नियमात बसणारी असली तरी या संदर्भात बाहेर आलेल्या एका पत्रामुळे याला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या पत्रानुसार देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघात पीकहानी करणाऱ्या जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. प्राण्यांमुळे पीकहानी होत असेल व शेतकरी याबाबत या भागाचे आमदार म्हणून देशमुख यांच्याकडे तक्रार करीत असतील तर अशा वेळी त्यांनी वनखात्याला सांगणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी स्वत:च प्रतिनिधी नियुक्त करणे, हे अनाकलनीय व तेवढेच धक्कादायक आहे.
देशमुख यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधीकडे शस्त्र परवाना असल्याचे पत्रातच नमूद केले असले, तरी अशा पद्धतीने प्रतिनिधी नियुक्तकरू शकतो काय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, देशमुख यांनी या पत्राच्या प्रती वन व महसूल अधिकाऱ्यांनासुद्धा दिल्या आहेत. आमदारांनी प्राण्यांचा मारेकरी नेमण्याच्या या प्रकारावर अधिकाऱ्यांनी सुद्धा काहीच आक्षेप का घेतला नाही, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हे पत्र ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध आहे. वनखात्याच्या नव्या नियमानुसार पीकहानी करणाऱ्या नीलगायीला शेतकरी मारू शकतात, पण त्यासाठी वनखात्याची परवानगी आवश्यक आहे. देशमुख व कंपनीने ती घेतली होती. त्यामुळे त्यात गैरकाहीच नाही, असे अधिकारी सांगतात.

शेतकरीहितासाठीच -आशीष देशमुख
ही शिकार नाहीच तर पीक संरक्षणासाठी जंगली प्राणी मारण्याची शासनानेच परवानगी दिली आहे. प्राणी आपण नव्हे, तर आपल्या सहकाऱ्यांनी मारले. त्यात नियमब्1ााह्य़ काहीच नाही, असा खुलासा देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांनीही देशमुखांना पाठिंबा दर्शविला आहे.

हे काही शौर्य नाही -सुधीर मुनगंटीवार
दरम्यान, या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पीक संरक्षणाच्या कारणावरून नीलगाय व रानडुकरांना मारण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात आली असली तरी मारलेल्या प्राण्यांसोबत छायाचित्रे काढून कोणी मिरवीत असेल तर ते चुकीचे आहे. प्राण्यांची हत्या करणे ही शौर्याची बाब कशी असू शकते,असा प्रश्न त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उपस्थित केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislators to appoint gun licence holder as bodyguard
First published on: 06-11-2015 at 01:03 IST