विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ दोन आठवडय़ांपेक्षा जास्त राहू शकतो, तसे संकेत सचिवालयातून मिळाले आहेत. ७ डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून सध्या १८ डिसेंबपर्यंत कामकाज निश्चित करण्यात आले आहे. यात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन पूर्व खबरदारी म्हणून एका आठवडय़ासाठी प्रश्न सूचना कार्यवाहीत घेतल्या जाणार आहेत. या अधिवेशनापासून ऑनलाईन पद्धतीने प्रश्न सूचना स्वीकारण्यात येत आहेत. यासाठी ‘क्यूआयएस’ या संगणक प्रणालीचा प्रथमच वापर होणार आहे.
सर्वसाधारणपणे नागपूरचे अधिवेशन दोन आठवडे चालते. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी कामकाज सल्लागार समितीची बैठक होते व त्यात कामकाजाला मंजुरी दिली जाते. एका आठवडय़ाचे पाच दिवस यानुसार दहा दिवस कामकाज चालते. यात विदर्भातील विविध प्रश्नांसह राज्यातील इतरही भागांमधील प्रश्नांवरही सभागृहात चर्चा होते.
नागपूर करारानुसार विदर्भात अधिवेशन घेतले जात असल्याने ते किमान तीन आठवडे चालावे अशी मागणी जुनीच आहे. आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून भाजप आणि शिवसेनेकडून दरवर्षी ही मागणी रेटून धरली जात होती. मात्र, युतीचे राज्य आल्यावरही मागील वर्षी दोनच आठवडे अधिवेशन चालले होते. दुष्काळ, नापिकी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पारंपरिक प्रश्नांसह विदर्भातील नागपुरातील गुंडगिरी व त्याला मिळणारा राजाश्रय यासारखे मुद्दे ऐरणीवर आहेत. त्यामुळे सरकारची कोंडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिवेशनाचा कार्यकाळ वाढविण्याची भाजप-सेनेचीच मागणी आता लावून धरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरात अधिवेशनाच्यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाने देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या कामासाठी रविभवन, आमदार निवासातील सर्व आरक्षण रद्द करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे रामगिरी यासह इतरही मंत्र्यांच्या निवासस्थानाच्या रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे. मुंबईहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवास व्यवस्थेची तयारीही सिव्हील लाईन्समधील १०८ खोल्यांच्या गाळ्यात करण्यात येत आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि विभानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नागपुरात येऊन यापूर्वीच तयारीचा आढावा घेतला होता व अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच तयारीची सर्व कामे हातावेगळी करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांना केल्या होत्या. त्यानुसार कामालाही गती आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2015 रोजी प्रकाशित
विधिमंडळ अधिवेशनाचा कार्यकाळ वाढण्याची शक्यता
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कार्यकाळ दोन आठवडय़ांपेक्षा जास्त राहू शकतो.
Written by मंदार गुरव

First published on: 18-11-2015 at 00:51 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legislature convention work time expected to increase