जंगल हा वन्यप्राण्यांचा अधिवास, पण दिवसेंदिवस त्यांच्या अधिवासातील माणसांची घुसखोरी त्याच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. व्याघ्रदर्शनाने वेडावलेल्या पर्यटकांमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेड या राखीव वनक्षेत्रातील मार्डी परिसरात एक वर्षांच्या मादी बिबटय़ाचा अपघाती मृत्यू उघडकीस आला. दोन दिवसापूर्वीचा हा मृत्यू असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोहरा-मालखेडच्या जंगलात किमान १५ ते १७ बिबटे असून एक वाघ आहे. राखीव वनक्षेत्र असूनही वनखात्याने या जंगलाकडे केलेले दुर्लक्ष पाहता हे जंगल वनखात्याचे आहे की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत या जंगलात अवैध कारवायांना ऊत आला आहे. सर्रास वेगात दुचाकी घेऊन जाणारेही वाढले असून जंगलातील घुसखोरी वाढली आहे. याच वेगवान वाहनाचा बळी एक वर्षीय मादी बिबट ठरला. जंगलातील रस्त्यावर वाहनाच्या धडकेने मृत पावलेल्या बिबटय़ाला वाहनधारकांनी जंगलात फेकले. विशेष म्हणजे, ज्या परिसरात मृत बिबटय़ाला फेकण्यात आले, त्या ठिकाणचे जंगलसुद्धा जळलेले आहे. तब्बल दोन दिवसानंतर दरुगधी सुटल्यामुळे ही घटना उघडकीस आली. याची माहिती संबंधित वनखात्याला दिल्यानंतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मृत बिबटय़ाला ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे संबंधित वनाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही.