टाळेबंदीमुळे मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर : ओडिशातून महाराष्ट्रात आलेल्या सुजीत अमित बिश्वास हे टाळेबंदीमुळे कामठी तालुक्यात अडकले असून त्यांची नऊ महिन्यांची गर्भवती पत्नी ओडिशातील एका गावातील घरात एकटीच दिवस काढत आहे. त्यामुळे तिच्या मदतीसाठी सुजीत यांची तगमग वाढली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्य़ातील खिडीरपूर पुरबापारा येथील सुजित यांचा डिसेंबर २०१७ ला विवाह झाला. ते कामाच्या शोधात पत्नीसह (पिंका विश्वास-रॉय) ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्य़ातील डारलीपाली येथे गेले. त्यांनी एक वर्ष तेथे एका कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम केले. पण कंपनीकडील काम संपल्याने बेरोजगार झाल्याने ते नागपुरात आले. कामठी तालुक्यातील कढोली येथे रेल्वेचे सिमेंट खांब (प्रि कास्ट) तयार करण्याचे काम त्यांनी केले. दरम्यान दरमहिन्याला ओडिशाला जात असे. टाळेबंदीपूर्वी १७ मार्चला ते जाऊन आले.
पण तेव्हापासून काम बंद आहे. त्यामुळे हातात पैसा नाही. ते इतर दहा मजुरांसह तंबू बांधून राहत होते. पण ती सुद्धा वादळी पावसामुळे मोडकळीस आली. स्थानिक प्रशासनाने व सरपंचांनी त्यांच्या निवासाची आणि जेवणाची सोय केली आहे.
एकीकडे हाताला काम नाही आणि पैसा नाही. दुसरीकडे नऊ महिन्यांची एकटी पत्नी ओडिशात अडकली आहे. तर आई-वडील पश्चिम बंगालमधील खिडीपूर परबापारा येथे राहत असल्याने त्यांनाही टाळेबंदीमुळे सुनेकडे जाता येत नाही. या चिंतेने सुजीत अस्वस्थ झाले आहे.
मदतीसाठी त्यांनी कढोलीच्या सरपंच प्रांजल वाघ व मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र लिहिले आहे. मात्र, सुजीत यांची गरोदर पत्नीला भेटण्याची तगमग सुरू आहे.
‘‘टाळेबंदी असल्याने माझे आई-वडील पत्नीकडे जाऊ शकत नाहीत. तिच्याकडे पैसे नाहीत. घरभाडे आणि किरणा साहित्यदेखील नाही. ती नऊ महिन्यांची गरोदर असल्याने तिच्याजवळ कोणीतरी असणे गरजेचे आहे. त्यामुळे माझे तिकडे जाणे आवश्यक आहे.’’
– सुजीत अमित विश्वास,
नागपुरात अडकलेला ओडिशा येथील कामगार.