scorecardresearch

अन् अनाथ, मूकबधिर ‘गणेश’च्या नव्या आयुष्याला सुरुवात ; कल्याण मूकबधिर विद्यालयाचा पुढाकार

विवाहासंबंधी सर्व पारंपरिक कार्यक्रम शाळेच्या परिसरात पार पडले. दोघांच्या जीवनातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

नागपूर : अनेक वर्षांपूर्वी चार महिन्याचे बाळ टेगडी गणेश मंदिर परिसरात सापडले. ते मूकबधिर होते. त्याला अनाथ आश्रमात ठेवण्यात आले. सातव्या वर्षांपासून तो रेशीमबागेतील कल्याण मूकबधिर विद्यालयात जायला लागला. तेथील एका शिक्षिकेने त्याच्यावर पुत्राप्राणे माया केली. संस्कार केले. शिक्षित झाल्यावर त्याला नोकरी लावून देण्यात आली. एवढेच नव्हे तर त्याला त्याची जीवनसाथी शोधून दिली. गुरुवारी त्याचा विवाह पार पडला. अशाप्रकारे एका अनाथ गणेशच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. एखाद्या हिंदूी चित्रपटाची कथा वाटावी अशी, गणेशची जीवन कहाणी आहे. जन्म झाल्यावर अवघ्या चार महिन्यातच त्याला जन्मदात्याने रेल्वेस्थानक परिसरातील टेकडी गणेश मंदिराजवळ सोडून दिले. ज्याला तो दिसला त्याने अनाथ आश्रमात आणून सोडले. तेथे त्याचे पालनपोषण झाले. सात वर्षांचा झाल्यावर मूकबधिर असल्यामुळे गणेशला रेशीमबागतील कल्याण मूकबधिर शाळेत टाकण्यात आले. शाळा प्रवेशासाठी आवश्यक असणारे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, जन्मतारीख यापैकी गणेशकडे काहीच नव्हते. मग ज्या दिवशी तो अनाथ म्हणून सापडला तो दिवसच त्याची जन्मतारीख निश्चित करण्यात आली. टेकडी गणेश मंदिराजवळ सापडला म्हणून त्याचे नाव गणेश ठेवण्यात आले. आता प्रश्न होता तो आडनावाचा. त्यासाठी शाळेने अनेकांना विचारणा केली. पण कोणीच पुढे येईना. अखेर शाळेच्या मुख्याध्यापक शाळा प्रमुख माला क्षीरसागर यांनीच त्याला आपले आडनाव दिले. त्यामुळे त्याचे गणेश शंकर क्षीरसागर असे नामकरण झाले. न्यायालयातून कागदपत्र तयार करण्यात आली. त्या आधारावर पॅनकार्ड, आधार कार्डसह शैक्षणिक कागदपत्र तयार केले. शाळेत क्षीरसागर यांनी गणेशला मुलासारखे वागवत संस्कारित केले. त्याचा शाळेतच वाढदिवस साजरा केला जात होता. गणेश ३० वर्षांचा झाला. त्याला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली. या दरम्यान शंकनगरातील मूकबधिर विद्यालयातील ‘खुशबू’ ही कल्याण मूकबधिर शाळेच्या संपर्कात आली. तिचा व गणेशचा विवाह करण्याचे ठरले. त्यासाठी मुलीच्या आईवडिलांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तयारी दर्शवल्यावर शाळेतील शिक्षकांनी विवाहाचा खर्च उचलला. विवाहासंबंधी सर्व पारंपरिक कार्यक्रम शाळेच्या परिसरात पार पडले. दोघांच्या जीवनातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Life story of deaf and dumb ganesh zws

ताज्या बातम्या