साहित्य रसिकांचा ‘विश्वास’घात!; उद्घाटकपदी विश्वास पाटलांच्या निवडीवर आक्षेप

झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवसांत पाटील यांनी शेकडो फाइली निकालात काढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ३ व ४ जुलै २०१७ रोजी सर्वप्रथम दिले होते

|| शफी पठाण

उद्घाटकपदी विश्वास पाटलांच्या निवडीवर आक्षेप

नागपूर : झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवसांत  अचानक ‘अतिकार्यतत्पर’ होऊन शेकडो फाइली निकालात काढणारे व त्यामुळे भ्रष्टाचारासारख्या गंभीर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले  विश्वास पाटील यांची नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड करण्यात आल्याने साहित्य क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  शनिवारी आयोजकांकडून  विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. यानंतर साहित्य क्षेत्रातून त्यांच्या निवडीवर नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवसांत पाटील यांनी शेकडो फाइली निकालात काढल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ३ व ४ जुलै २०१७ रोजी सर्वप्रथम दिले होते. या वृत्तानंतर खळबळ उडाली होती.   तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.  प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने ३३ प्रकरणांत घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढला होता. पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेत ‘लोकसत्ता’विरुद्ध आठ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता. आपल्याविरुद्ध काहीही बदनामीकारक वृत्त छापण्यास मनाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी याचिकेद्वारे केली होती; परंतु त्यांची ही मागणी तेव्हाच फेटाळण्यात आली होती. नंतर तर ते स्वत:च खटल्याच्या तारखांना  हजर राहिले नाहीत.  अखेर उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. विश्वास पाटील यांची केवळ शासकीय कारकिर्दीच नाही तर वाड्:मयीन प्रवासही वादग्रस्त राहिला आहे. ‘लस्ट फॉर लालबाग’चे कथानक माझ्याच लिखाणावरून चोरलेले आहे, असा गंभीर आरोप खुद्द त्यांचे भाऊ सुरेश पाटील यांनी केला होता. अशी वादग्रस्त पाश्र्वभूमी असतानाही संमेलनाचा उद्घाटक म्हणून त्यांची निवड  करण्यात आल्याने साहित्य क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्घाटन समारोपाची नावे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रसची मंडळीच ठरवताहेत, याबाबतचे निर्णय घेताना महामंडळाला अंधारात ठेवेल जातेय, अशीही माहिती आहे.

इतर भाषिक उद्घाटकांची परंपरा….

इतर भाषांशी संबंध जोपासणे हे महामंडळाच्या घटनेत नमूद एक कर्तव्य असल्याने याआधी अनेक संमेलनात गिरीश कर्नाड, भैरप्पा, हिंदीतील प्रसिद्ध नाव विष्णू खरे, रघुवीर चौधरी, बंगाली साहित्यिक सुनील गंगोपध्याय, शितांशू यशशचंद्र यासारख्या नामांकित व ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरविलेल्या मान्यवरांनी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. ती परंपरा नाशिकच्या संमतेलनात मात्र खंडित होणार आहे.

राजकीय मांदियाळी कायमच

नाशिक : उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

तीन ते पाच डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाचे भूमिपूजन शनिवारी भुजबळ नॉलेज सिटी येथे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी भुजबळ यांनी उपरोक्त माहिती दिली. संमेलनावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचा वरचष्मा राहणार आहे. काँग्रेस संयोजकांच्या खिजगणतीत नसल्याचे दिसते. मुळात साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय मंडळींच्या वाढत्या उपस्थितीची यापूर्वी अनेकदा चर्चा झाली आहे. साहित्य महामंडळ यावर नाराजी व्यक्त करण्यापलीकडे जात नाही. या संमेलनात राजकीय मंडळींचा प्रभाव कायम राहणार आहे. 

संताप कशामुळे?

इतर भाषांशी संबंध जोपासणे हे महामंडळाच्या घटनेत नमूद एक कर्तव्य असताना व त्या कर्तव्य पालनाची महामंडळाची जाज्वल्य परंपरा असतानाही तिला मुरड घालत संमेलनाच्या उद्घाटकासाठी बऱ्याच दिवसांपासून चाललेली शोध मोहीम वादग्रस्त विश्वास पाटलांवरच येऊन का थांबली, असा प्रश्न साहित्य क्षेत्रातून विचारला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Literary aficionados announcing the name of vishwas patil akp