पारशिवनी येथील थरारक घटना

प्रेमात लग्नाला नकार दिल्याने वेडय़ा प्रियकराने प्रेयसीवर दिवसाढवळ्या रस्त्यावर चाकूने हल्ला करून निर्घृण खून केला. ही थरारक घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगोरी येथे शनिवारी सकाळी १० वाजता घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

मंगल ऊर्फ साजन बागडे (२३) रा. सावळी, ता. पारशिवनी असे आरोपीचे नाव आहे, तर रत्नमाला राजकुमार रागनकर (२२) रा. सिंगोरी, ता. पारशिवनी असे मृत तरुणीचे नाव आहे. शिक्षण घेत असताना दोघांनी ओळख झाली होती. त्यातून मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान, ते एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. आरोपी हा तिला विवाहाची मागणी करीत होता, परंतु काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तिचे वडील वेकोलित नोकरीला होते. तिच्या तिन्ही बहिणी विवाहित असून ती आईचा एकमेव आधार होती. वर्षभरापूर्वी तिला वडिलांच्या ठिकाणी अनुकंपावर वेकोलित नोकरीही मिळाली. त्यामुळे तिने त्याला लग्नास नकार दिला होता. तेव्हापासून तो तिच्यावर चिडून होता. शनिवारी सकाळी १० वाजता ती वेकोलित नोकरीवर जाण्याकरिता घरातून आपल्या मोपेडने निघाली. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. सावळी शिवारात गावाबाहेर त्याने तिला अडवले व पुन्हा लग्नाची मागणी करू लागला. तिने नकार दिला असता त्याने तिला जमिनीवर पाडले व तिच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार केले. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी  पळून गेला. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी तिच्या आईला माहिती दिली. तिची आई सुमित्रा रागनकर यांनी पारशिवनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीप्रसाद दुबे, सूरज परमार, वीरेंद्र नरड, प्रणयसिंग बनाफर यांनी आरोपीला सावनेर परिसरात अटक केली.