प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

कोणी काहीही म्हणत असले तरी विद्यापीठाने पदव्युत्तर शैक्षणिक विभागांसाठी सुरू केलेल्या अर्ध ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील वर्षीपासून विद्यापीठांचे विभाग आणि संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्रवेश ऑनलाइन करण्याचा मानस प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला आहे. प्र-कुलगुरू पदाची दोन वर्षे डॉ. येवले यांनी पूर्ण केली असून या दोन वर्षांत त्यांनी केलेल्या विविध सुधारणांपैकी अर्ध ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सध्या चर्चा आहे. कारण त्यापूर्वी त्यांनी व्यवस्थापन कोटा बाद करून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिली. त्याची चर्चा प्राचार्याच्या वर्तुळात आहे.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान त्यांनी विद्यापीठात ‘काय नव्हते आणि काय आहे’ यावर औपचारिक चर्चा केली. विद्यार्थी व पालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण हवे असते. मात्र, बरेचदा शिक्षकच त्यात खोडे घालायची कामे करतात. मग ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत असोत, अभ्यासक्रम अद्ययावत न करणारे असोत किंवा संशोधन मान्यता समितीत वाद घालणारे प्राध्यापक असोत, याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होतो. विद्यापीठात केलेल्या अनेक सुधारणांपैकी पीएच.डी.चे नियम व निकष बदलताना विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचा विरोध झाला नाही, तर तथाकथित मार्गदर्शक, संस्थाचालक यांचा विरोध झाल्याचे डॉ. येवले यांनी आवर्जून सांगितले. पीएच.डी. करणाऱ्यांना ‘अभ्यासवर्ग’ (कोर्सवर्क) सक्तीचा करण्यात आला आहे. पूर्वी कुणाचेही प्रमाणपत्र आणून कोर्सवर्क झाल्याचे सांगितले जायचे. आता कोर्सवर्क केल्याशिवाय पीएच.डी.चे काम पुढे सरकत नाही. विद्यापीठ प्राधिकरणांच्या निवडणुकांना अद्यापपर्यंत सुरुवात झाली नसून उद्या, पदवीधर मतदारसंघाची अधिसूचना निर्गमित होईल, अशी अपेक्षा प्र-कुलगुरूंनी व्यक्त केली. पुढील वर्षी ऑनलाईन प्रवेश, अभिलेखांचे संगणकीकरण, तथ्य संकलन केंद्र आणि वाङ्मय चौर्यावर बंदी यावर भर देण्यात येणार आहे. जेथे स्पर्धा असते, तेथेच कॅप यशस्वी होते आणि कॅपमध्ये जे डावलले गेले त्यांच्यासाठी व्यवस्थापन कोटय़ाची संकल्पना आहे. मात्र, महाविद्यालयांनी सरळसरळ याचा व्यवसाय केला. गुणवत्ता यादी जाहीर न करताच ज्याला जसे पाहिजे तसे प्रवेश देण्यात येऊ लागले. त्यातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. विद्यार्थ्यांच्या तक्रारींवरूनच सावनेरच्या आदमने महाविद्यालयातील प्रवेश रद्द करून आम्ही गुणवत्ता यादी जाहीर केली. अशाच काही अनियमितता महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिये दरम्यान केल्या असल्यास त्यांनी केलेले प्रवेश रद्द करून नव्याने प्रवेश करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

गुटखा म्हणे ५०० रुपयांचा

विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी असंख्य त्रासांना सामोरे जावे लागायचे. अगदी त्यांचे प्रबंध कुठे पाठवले गेले याची माहिती सांगणारा एक कर्मचारी पीएच.डी.कर्त्यांला गुटखा आणायला लावत असे. ज्या टपरीवरून तो गुटखा घ्यायचा त्याला ५०० रुपये द्यावे लागत. संबंधित व्यक्ती तो घेऊन आला म्हणजे त्याने ५०० रुपये दिले असे समजून तो त्या पीएच.डी.कर्त्यांला अपेक्षित माहिती देत असे. सध्या या गुटखा बहाद्दराला संबंधित कामातून दूर करण्यात आले.