इतिहासात अजरामर होऊन गेलेल्या महापुरुषांचे स्मरण करत पुढे जाणे यात गैर काही नाही. त्या काळात समाजावर प्रभाव निर्माण करणाऱ्या, त्यांच्यातला अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या अशा महनियांची आठवण नेहमीच प्रेरणा देणारी. त्यातल्या कोणत्या आठवणी जागवायच्या व कोणत्या नाही याचे तारतम्य असणेही आवश्यक. ते नसले की अकारण वाद निर्माण होतात. अमरावती विमानतळाच्या संदर्भात नेमके तेच घडू लागलेले. या नव्या व सुसज्ज तळाला नेमके कुणाचे नाव द्यावे यावरून सध्या वाद पेटलेला. सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून असलेला एक गट म्हणतो प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचे नाव द्या तर विरोधक म्हणतात पंजाबराव देशमुखांचे. तसे कोणत्याही स्थळाचे नामकरण हे प्रतीकात्मक असते. नुसते नाव दिले वा बदलले म्हणून समाजात काही बदल घडेल अशी आशा बाळगणे सुद्धा भाबडेपणाच. तरीही हा नामकरणाचा आग्रह धरला जातो. अशावेळी सरकारी पातळीवर तरी संतुलित भूमिका घेतली जावी अशी अपेक्षा असते. अमरावतीच्या बाबतीत सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नसला तरी सत्तापरिवाराकडून ज्या पद्धतीची पावले टाकली जात आहेत त्यावरून तो निर्णय काय असेल याची कल्पना येते. या पार्श्वभूमीवर पंजाबराव व गुलाबरावांच्या कार्याचे स्मरण व तुलना अपरिहार्य ठरते.
कृषी क्रांतीचे प्रणेते, घटना समितीचे सदस्य व बहुजनांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या पंजाबराव देशमुखांशिवाय वऱ्हाडचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षण घेतल्याशिवाय सामाजिक सुधारणा शक्य नाही असा नुसता प्रचार करून ते थांबले नाहीत तर शिवाजी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. एका झोपडीत श्रद्धानंद अनाथालय सुरू केले व त्यात गरीब मुलांची राहण्याची व्यवस्था केली. त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा निझामाकडून देणगी घ्यायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. ती का घेतली म्हणून त्यांच्यावर टीका करणारे तेच अभिजन होते जे आता त्यांच्या नावाला विरोध करत आहेत. बहुजनांना शिक्षण देता यावे म्हणून मी चोरांकडूनही पैसे घेईन अशी स्पष्ट भूमिका मांडणारे पंजाबराव आजही मोठे ठरतात ते यामुळे. वऱ्हाड प्रांत आजही इतर विभागाच्या तुलनेत मागास जरूर पण त्यामागील कारणे भौगोलिक आहेत. शिक्षणात मात्र या विभागाने घेतलेली भरारी पूर्व विदर्भाला मागे टाकणारी आहे. अशा द्रष्ट्या नेतृत्वाच्या नावाला सत्तावर्तुळातून विरोध का केला जात आहे? बहुजनांनी शिकावे, मोठे व्हावे ही त्यांची भूमिका या वर्तुळाला आजही मान्य नाही असे समजायचे काय? आज प्रभावी ठरलेले हे सत्तावर्तुळ बहुजनांच्याच पाठबळावर मोठे झाले या सत्याचा विसर पडला की काय? भविष्यात ओबीसींना मिळणारे फायदे लक्षात घेऊन मराठा नको कुणबी म्हणवून घ्या असे सर्वात आधी सांगितले ते पंजाबरावांनी. याच मतांच्या बळावर मोठे झालेल्या सत्तावर्तुळाचा आताचा विरोध मग नेमका कशासाठी? ते केवळ काँग्रेसमध्ये होते म्हणून की त्यांनी बहुजनवादी भूमिका घेतली म्हणून. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे बहुतांश नेते काँग्रेसमध्येच होते. तेव्हा तोच मोठा व एकमेव पक्ष होता व त्याच्या विचारधारेचा समाजावर प्रभाव होता. केवळ या एका कारणासाठी पंजाबरावांचे अस्तित्व नाकारणे संपूर्ण वऱ्हाडावर अन्याय करणारे ठरेल याची जाणीव सत्तावर्तुळाला आहे का?
आता गुलाबरावांविषयी बघू. स्वत:ला ज्ञानेश्वरकन्या समजणारे व त्यासाठी अनेकदा स्त्रीवेश धारण करणारे हे महाराज माधानचे. त्यांचे सर्व लेखन आध्यात्मिक. लिहिणे, वाचणे हा अधिकार केवळ अभिजनांचा असा सार्वत्रिक समज असल्याच्या काळात या महाराजांनी केलेली ज्ञानसाधना केवळ अद्वितीय म्हणावी अशीच. ते आंधळे होते. तरीही त्यांनी अभ्यासाच्या बळावर समाजात स्वत:चे स्थान निर्माण केले. सोबतच्या सहकाऱ्यांकरवी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचे साहित्य संस्कृतप्रचूर. मधुराशक्ती, कात्यायनी व्रत असे त्यांचे अनेक उपक्रम आजही चर्चेत असतात. मात्र कोणत्या वर्तुळात हा यातला कळीचा प्रश्न. त्याचे उत्तर आहे अभिजनांच्या वर्तुळात. जातीने बहुजन असलेल्या गुलाबरावांचा विचार नेहमी उजव्या वर्तुळाला भावत आलेला. या एका कारणासाठी त्यांचे नाव समोर करणे योग्य कसे ठरू शकेल? धर्माची चिकित्सा, कर्माने व जातीने श्रेष्ठ कोण यावरचे त्यांचे विचार आजच्या काळात आधुनिक कसे ठरू शकतात? त्यांच्या या विचाराचा संपूर्ण वऱ्हाडावर आजही प्रभाव आहे अशी स्थिती सुद्धा नाही. या महाराजांची धर्मविषयक साधना भावली ती उजव्या विचारधारेला. ही गोष्ट ते जिवंत असतानाची. त्यातूनच नागपूरचे एक प्रसिद्ध घराणे त्यांच्या कार्याशी जुळले. हे तेच घराणे जे उजव्या विचाराचे समर्थक होते. या एका कारणावरून त्यांना आपला समजणे व पंजाबरावांना परक्यांच्या यादीत टाकणे योग्य कसे ठरेल? आताच्या विज्ञानवादी युगात आध्यात्मिक विचाराला किती थारा द्यायचा यावरही साधकबाधक विचार होणे गरजेचे. याच गुलाबराव महाराजांनी डार्विनच्या सिद्धांताला चूक ठरवले होते. आजही सत्तावर्तुळातील अनेकजण डार्विनला चूक ठरवतात व स्वत:चे हसे करून घेतात. या दृष्टिकोनातून महाराजांचा विचार प्रतिगामी ठरतो. मग या पार्श्वभूमीवर विचार कोणता पुढे न्यायचा? पंजाबरावांचा की गुलाबरावांचा? सामाजिक सुधारणा आदर्श मानायच्या की अध्यात्म? यावर विचार करण्याची वेळ आता आली आहे.
अमरावतीच्या विमानतळाचे उद्घाटन ठरल्याचे जाहीर झाल्यावर याच शहरातील एका प्राचार्याने गुलाबरावांचे नाव देण्यात यावे असे पत्र प्रशासनाला दिले. ही घडामोड जाणीवपूर्वक होती. अभिजनांच्या वर्तुळात वावरणाऱ्या पण थेट सत्तेशी संबंध नसलेल्या या प्राचार्याला कुणी समोर केले हे न कळण्याइतपत वऱ्हाडचे लोक दूधखुळे नाहीत. नंतर हळूच ही मागणी रेटण्यात आली. यातून सुरू झाले ते राजकारण. सत्तावर्तुळाला नेमके हेच हवे होते. आता गुलाबराव महाराजांवर विविध माध्यमात लेख प्रकाशित ‘करवून’ आणले जात आहेत. त्यांच्या काही पुस्तकांच्या प्रकाशनाचा घाट घातला जात आहे. हे सर्व का केले जात आहे तर पंजाबरावांपेक्षा ते मोठे हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी. हाती सत्ता आहे म्हणून एकवेळ हे सारे प्रकार खपूनही जातील पण बहुजनांच्या मनात पंजाबरावांविषयी असलेले अढळ स्थान कसे संपवता येईल? केवळ नामकरणाने कुणी मोठा वा लहान होत नाही पण संधी मिळाली की आपल्या विचाराच्या महापुरुषाचे स्मरण करायचे ही वृत्ती बहुजनांवर अन्याय करणारी आहे याची जाणीव या वर्तुळाने ठेवलेली बरी. विमानतळ हे विकासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. विकासाच्या व्याख्येतच सुधारणावादी भूमिका दडलेली आहे. हे लक्षात घेतले तर पंजाबरावांचे नाव योग्य ठरते. गुलाबरावांचा विचार अध्यासनापुरता मर्यादित आहे. त्यावर सत्तावर्तुळाने जरूर विचार करावा. मात्र पंजाबरावांवर अन्याय होणार नाही याचीही काळजी घ्यावी. सध्या ‘झोपू’ योजनेचे सदस्य झालेले अमरावतीतील विरोधक या मुद्यावर जागे होतील अशी आशा बाळगू या!
devendra.gawande@expressindia.com