या पुरोगाम्यांना काही कामधंदा आहे की नाही? गेली अकरा वर्षे सतत विरोधी बाकावर बसावे लागल्याने यांच्या बुद्धीला वाळवी लागली की काय? ‘कुणी निंदा, कुणी वंदा टीका करण्याचा आमचा धंदा’ या उक्तीला कवटाळून हे लोक किती काळ बसणार? उजव्यांचा द्वेष करून यांना मिळणार तरी काय? यात आत्मीय समाधान नाही हे यांच्या लक्षात तरी कधी येणार? समाजातला एखादा गट, संस्था किंवा समूह त्यांच्या समाधानासाठी एखादी कृती करत असेल तर यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय? होय, वाहिली नागपूरच्या चित्पावन ब्राह्मण संघाने विनोबांना आदरांजली. यात चूक काय? विनोबा त्यांच्या जातीचे म्हणून त्यांना तेवढाही अधिकार नाही का? मग ओरडण्याचे कारण काय? विनोबांचे काम मोठे, त्यावरून त्यांना ओळखले जावे. जातीवरून नाही ही भूमिका कधीचीच जुनी झाली. आता पुरोगामी वगळता इतर कुणीही हिंग लावून विचारत नाही याला. मग कशाला मध्ये कडमडायचे? कुसुमाग्रजांची ‘अखेर कमाई’ ही कविता पुरोगामीच गुणगुणतात ना नेहमी! त्यात तर म्हटलेच आहे. महात्मा फुले माळ्यांचे. शिवाजीराजे मराठ्यांचे. आंबेडकर बौद्धांचे व टिळक चित्पावनांचे. आता कुणाचे एकट्या टिळकांवर समाधान होत नसेल व त्यांच्या सोबतीला त्यांना विनोबाही हवे असतील तर त्यात चूक काय? आजकाल प्रत्येक जातींनी महापुरुष व संत वाटून घेतले. शेवटी प्रत्येक जातीला एक वैचारिक आधार हवा असतो. यामुळे त्या महनीयांचे नाव वर्षानुवर्षे चालत राहील याची हमीच मिळते. असा तर्कशुद्ध विचार पुरोगामी का करत नाहीत?

आधीच्या बारा बलुतेदारीत प्रत्येक जातीधर्माचे संत होतेच की! त्यांच्या आदर्श विचारामुळेच या सर्वांचे जगणे सुसह्य झाले. अपवाद फक्त गांधींचा. ते वैश्य होते. हा समाज त्यांच्यामागे उभा ठाकला नाही. कुसुमाग्रजांनीच म्हटल्याप्रमाणे ‘म्हणून गांधींच्या वाट्याला सरकारी भिंती आल्या.’ आज सर्वत्र गांधींची अवहेलना होते ती केवळ आणि केवळ यामुळे. अशा स्थितीत एखादा समाज विनोबांच्या वाट्याला असे काही येऊ नये म्हणून पुढाकार घेत असेल व विनोबांना सुरक्षिततेचे कोंदण मिळवून देत असेल तर त्यात चूक काय? गांधींच्या मागे केवळ सरकारी भिंती उरल्या हे कुसुमाग्रजांचे प्रतिपादनही सध्याचे पुरोगामी चूक ठरवतात. त्यांच्या मते या महात्म्याच्या मागे अवघा समाज होता. तोही जाती, धर्म, पंथ भेद विसरून. हे जर खरे मानायचे तर आज हा समाज गेला कुठे? आता तर याच समाजात गांधींना शिव्या देण्याची जणू स्पर्धा सुरू झालेली. रोज कुणीतरी उठतो व आगपाखड करतो. देशाच्या दुर्दशेला तेच जबाबदार असे म्हणतो. हे कसले राष्ट्रपिता असेही म्हणतो. इतकी वाईट स्थिती गांधींच्या वाट्याला का आली यावर हे पुरोगामी कधी विचार करणार का? अशी गत विनोबांची होऊ नये म्हणून मग त्यांच्या जातीने पुढाकार घेतला तर त्यात गैर काय? महापुरुष व संत हे जातीने नाही तर कर्म व विचाराने ओळखले जायला हवेत हे खूपच आदर्शवादी वाक्य झाले. आजच्या काळात या वाक्याला जागाच उरलेली नाही. आता तर सर्वत्र जातींचा बोलबाला. कुसुमाग्रज आज हयात असते तर त्यांना हीच कविता वाढवावी लागली असती. सध्याचे वातावरण पाहू जाता कदाचित ती नव्याने लिहिण्याचे धाडसही त्यांना झाले नसते. अशा काळात एखादी संघटना विनोबांवर हक्क सांगत असेल तर ते योग्यच हे या पुरोगाम्यांनी ध्यानात घ्यावे. विनोबा पुरोगामी विचाराचे होते. गांधींचे पहिले सत्याग्रही होते. त्यांनी भूदान कार्यक्रम राबवून देशभरातील भूमिहीनांना जमीन मिळवून दिली. इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला त्यांनी अनुशासन पर्व संबोधले. हे सारे बरोबर पण हा इतिहास झाला. आता त्याला कवडीचीही किंमत नाही. सध्या लिहिला जातो तो नवा इतिहास. भविष्यात तोच खरा असेल याचीही हमी आज दिली जाते. कदाचित विनोबांचाही नवा इतिहास भविष्यात लिहिला जाईल. हे सारे तर्क पुरोगामी लक्षात का घेत नाहीत? विनोबा पुरोगामी होते म्हणून आमचे असा आग्रह धरणेच मुळात चूक. समजा, तुमचा हा आग्रह एकदाचा मान्य केला तर तुम्ही विनोबांच्या विचाराला किती पुढे नेले? त्यांच्या आध्यात्मिक लोकशाहीवादी विचाराचा किती प्रसार केला? सध्या बंद पडलेली भूदान चळवळ पुनरुज्जीवित केली का? या देशात श्रीमंत-गरीब असा भेद राहू नये यासाठी नेमके काय प्रयत्न केले? या सर्वांची उत्तरे नकारात्मक येतात हे पुरोगामी मान्य करतील काय?

मग जाऊ द्या की विनोबांना जातीच्या कळपात. बघा कसे नाव होते त्यांचे देशभर. त्यांनी मांडलेला आध्यात्मिक लोकशाहीचा विचार सत्ताधाऱ्यांनी तर अनेकदा बोलून दाखवलाच आहे. बघा कशी फटाफट अंमलबजावणी होते त्याची. भलेही असतील जातीचे कंपू पण त्यांची प्रचार-प्रसाराची नियत साफ असेल तर पुरोगाम्यांनी हरकत घेण्याचे कारण काय? स्वत:ही काही करायचे नाही व दुसऱ्याने पुढाकार घेतला तर त्यालाही हरकत घ्यायची हा खेळ किती काळ चालणार? समाजात सद्भावना टिकावी, जातीधर्मात तेढ नसावी हेच विनोबांचे विचार समाजात पोहोचले पाहिजेत असे वाटत असेल तर आहे की पुरोगाम्यांच्या ताब्यात सर्वोदय आश्रम. घ्या तिथे कार्यक्रम, तेही वरचेवर. तिथे गर्दी कशी होईल याकडेही लक्ष द्या जरा. बोलणारे व ऐकणारे तेच तेच चेहरे हे चित्र आणखी किती काळ बघायचे? जरा मेहनत करून बदल घडवून आणा की त्यात. मेहनतीची तयारी नाही व कुणी पुतळ्याला हार घालायला आले की त्यांना नावे ठेवत केवळ तोंडांची वाफ दवडण्यात वेळ घालवायचा हे योग्य कसे ठरवता येईल. पुरोगाम्यांनो जरा विचार करा यावर. तुमच्या नाकर्तेपणामुळेच एकेक महापुरुष तुमच्या हातातून निसटून चाललेत. असेच होत राहिले तर तुमच्याजवळ केवळ गांधी उरतील. याच महात्म्याचे विचार देशाला प्रगतिपथाकडे नेणारे हे सत्य असले तरी ते समाजाला पटेल अशी स्थिती राहिली का यावर विचार करा जरा. मग ही स्थिती कोण बिघडवतेय व त्याविरुद्ध काय करता येईल यावर मंथन करा. दिवाणखान्यात बसून कुणाला नावे ठेवणे, टीका करणे विसरा. अन्यथा भविष्यात गांधीही पळवले जातील व तेच कसे हिंदू धर्माचे एकमेव नेते होते असा नवा इतिहास लिहिला जाईल. समाजात जात हा घटक मोठा कसा झाला? त्याला कुणी खतपाणी घातले? धर्माचे महत्त्व कुणी वाढवले? अल्पसंख्यकांचे तुष्टीकरण कुणी केले या प्रश्नांना भिडण्याचे सोडून विनोबा पळवले असा कांगावा करण्याचे काही कारण नाही. आता पुढे बघाच विनोबा कसे देशव्यापी होतात ते!

devendra.gawande@expressindia.com