’ न्या. मीरा खडक्कार यांचे प्रतिपादन ’ लोकसत्ता ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
‘एकल पालकत्व’ हा गंभीर सामाजिक समस्या असून ती सोडवण्यासाठी चळवळीची गरज आहे, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्या. मीरा खडक्कार यांनी केले.
लोकसत्ता विदर्भरंग दिवाळी अंकाचे प्रकाशन मंगळवारी न्या. मीरा खडक्कार व महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांच्या हस्ते लोकसत्ता कार्यालयात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे, जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक सारंग पाटील उपस्थित होते. लोकसत्ताने विचारांना चालना देणारा विषय ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकातून हाताळला, याचा मनस्वी आनंद आहे. एकल पालकत्व हा विषय माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे. त्याचा अभ्यास मी जवळून केला आहे. मानसशास्त्रात लहान मुलांच्या हक्कांविषयीची तरतूद आहे. मुलांना विशिष्ट वयापर्यंतच नाही तर आजन्म आई आणि वडील या दोघांनाही भेटण्याची गरज आहे, असे मीरा खडक्कार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विधवा आणि घटस्फोटीत एकल पालकांकडे समाज वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसे पाहतो, हे देखील सांगितले.
अशा लोकांनी एकत्रित येऊन एखादी संघटना तयार करणे ही आज काळाची गरज आहे. कारण संघटना असेल तर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक सोपे जाईल. लोकसत्ताने त्यांच्या व्यासपीठावरून एकल पालकत्वाची चळवळ सुरू ठेवावी, त्याला माझे सहकार्य असेल, असेही त्यांनी सांगितले. एकल पालकत्व हा विषय गंभीर आहे आणि थोडय़ाफार फरकाने अलीकडच्या काळात प्रत्येकच घरात तो पाहायला मिळतो. कारण एक जण घराची जबाबदारी सांभाळत असतो तर दुसरा घराबाहेर असतो.
‘विदर्भरंग’ दिवाळी अंकातून एकल पालकत्वाचा विषय हाताळल्यामुळे या विषयाची संवेदनशीलता वाढीस लागेल, असे अनिल कोकाटे म्हणाले. समाजमाध्यमाच्या काळात दिवाळी अंकाविषयी असलेली ओढ, आतुरता कमी होत चालली आहे. पूर्वी फराळ, फटाक्यांसोबतच दिवाळी अंकासाठी भांडणे व्हायची.
आता अंक आयुष्यातून दूर होत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लोकसत्ता विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे यांनी विदर्भरंग दिवाळी अंक आणि त्यात हाताळण्यात आलेल्या एकल पालकत्व या विषयामागील भूमिका मांडली. एकल पालकत्व हा विषय समाजाकडून दुर्लक्षित असला तरीही तो वास्तव आहे. बरेचदा हा नाईलाज असतो.
आई आणि वडील अशी दुहेरी जबाबदारी निभवणे कठीण असले तरीही अनेकजण ही दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे निभवतात. त्यांचा हा खडतर, पण यशाकडे नेणारा प्रवास यंदा विदर्भरंग दिवाळी अंकाच्या निमित्ताने वाचकांसमोर उलगडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याला लोकसत्ताचे सर्व सहकारी उपस्थित होते.
लोकसत्ता ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना कौटुंबिक न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्या. मीरा खडक्कार, महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे. व्यासपीठावर वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे, जाहिरात विभागाचे व्यवस्थापक सारंग पाटील.