नागपूर : जगातील सर्वात मोठा वाघ कुठे, असे म्हटले तर मध्यप्रदेशकडे बोट दाखवावे लागेल. वाघाच्या संवर्धनासाठी समर्पित या राज्यासारखे दुसरे राज्य नाही, असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. आता याच मध्यप्रदेश राज्यात जगातील महाकाय वाघ असण्याचा विक्रम नोंदवला जाण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या खवासा गावात जगातील सर्वात मोठ्या नर वाघाच्या प्रतिमेची निर्मिती करण्यात आली आहे. बुधवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सिवनी येथे बसून या भव्य प्रतिमेचे अनावरण केले. या कलाकृतीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रतिमा भंगार साहित्यापासून साकारण्यात आली आहे.
असा झाला तयार…
विविध लोखंडी तुकडे, टीनाचे पत्रे, सायकलींची चाकं आणि इतर स्क्रॅप साहित्य यांच्या संयोगातून हा १७.५ फुट उंच, ८ फुट जाड, ४० फुट लांब व १० टन वजनाचा हा महाकाय वाघ उभा राहिला असून, जगातील सर्वात मोठ्या वाघाच्या प्रतिमेचा मान या कलाकृतीला मिळाला आहे.
गेल्या वर्षभरापासून हे काम खवासा येथील बफर गेट जवळ सुरू होते. मोठ्या प्रमाणावर स्क्रॅपचे ढिगारे-लोखंडी तुकडे, टीनाचे टप्पर, चाकांचे अवशेष अन भंगार पसरलेले दिसायचे. कलाकार तेथे बसून प्रत्येक तुकडा जुळवत संयमाने वाघाची आकृती साकारत होते. सिवनी येथील मुख्य कलाकार कृशब कश्यप यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण काम २०० दिवस चालू होते. अत्यंत सुंदर असे रंगकाम या वाघाला केले आहे. वाघाच्या समोरील बाजूला ३ लोखंडी मनोरे केले आहे ज्यावर चढून बघता येते.
व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक रजनीश सिंह म्हणतात…
यापूर्वी जगातील सर्वात मोठी वाघाची प्रतिमा अमेरिकेत आहे. आता खवासा येथे तयार झालेली ही प्रतिमा त्या मानाने सर्वात मोठी ठरली आहे. या उपक्रमात आणखी एक आनंददायी बाब म्हणजे या वर्षी पावसाळ्यात पेंच व्याघ्र प्रकल्पातील काही गावांमध्ये स्थानिकांच्या सहकार्याने मातीचे वाघ तयार करण्याचा उपक्रम राबवण्यात आला.
बनियन ट्री फाउंडेशनच्यावतीने आम्ही या संकल्पनेला हातभार लावला. पेंचमधील निवडक शाळांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडून मातीचे वाघ तयार केले होते. सुमारे ७,००० मातीचे हे वाघ साकारले होते. त्यांना व्यवस्थित भाजून टिकाऊ आकार देण्यात आला होता. यातील काही मातीचे वाघ आणि प्लेट्स या भव्य वाघाच्या पायाजवळ सजावटीचा भाग म्हणून वापरण्यात आले आहेत. आपण केलेल्या या छोट्या प्रयत्नांचा उपयोग जगातील सर्वात मोठ्या वाघाच्या निर्मितीत झाला याचा अभिमान आहे.
याबाबत संजय करकरे म्हणाले…
मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाची टीम नेहमीच नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपक्रमांसाठी ओळखली जाते. आता या अनोख्या तीन आर—Reduce, Reuse, Recycle—चा उत्तम वापर करून साकारलेल्या या महाकाय प्रतिमेने पुन्हा एकदा त्यांच्या कार्याची गुणवत्ता सिद्ध झाली आहे. पेंचच्या संपूर्ण टीमचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. दोन–तीन वेळा या ठिकाणी भेट दिली होती. पहिल्या दिवसापासून ते अंतिम अनावरणापर्यंत या कलाकृतीचे कसे रूपांतर होईल याची उत्सुकता कायम होती आणि काल प्रत्यक्ष प्रतिमा पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला.
