खापरी ते बर्डी २० रुपयात प्रवास; महामेट्रोचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : मेट्रो सुरू होण्यापूर्वीच तिच्या तिकीट दराबाबत नाराजीचे सूर ऐकू येऊ लागल्याने मेट्रो प्रशासनाने तातडीने खापरी ते बर्डी आणि लोकमान्य नगर ते सुभाषनगर या दोन मार्गावरील प्रवास भाडय़ात अनुक्रमे १४ रुपये १३ रुपयांची सवलत जाहीर केली आहे. त्यामुळे आता शहर बसपेक्षा किंचित अधिक दरात प्रवाशांना मेट्रोचा प्रवास अनुभवता येणार आहे.

मेट्रोची प्रवासी वाहतूक लवकरच सुरू होणार असून त्यासाठी तयारी पूर्ण केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांना प्रवासी दरात सवलत देण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे. वर्धा मार्गावरील (रिच-१ कॉरिडोर) खापरी ते सीताबर्डी आणि हिंगणा मार्गावरील (रिच-३ कॉरिडोर) लोकमान्य नगर ते सुभाषनगर दरम्यान मेट्रोच्या प्रवासी वाहतूक सुरू होणार असून या दोन्ही मार्गिकांवर ही सवलत असेल.

खापरी ते सीताबर्डीपर्यंत मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना केवळ २० रुपये द्यावे लागतील. तसेच लोकमान्य नगर ते सुभाषनगर दरम्यान १० रुपये मोजावे लागतील. खापरी ते सीताबडीपर्यंत एकूण १३ कि.मी.साठी ३४ रुपये आणि लोकमान्य नगर ते सुभाषनगर दरम्यान ५.५ कि.मी.साठी २३ रुपये प्रवासी दर निर्धारित करण्यात आले होते. त्यामुळे वरील दोन्ही मार्गावर अनुक्रमे १४ रुपये १३ रुपयाची बचत होणार आहे.

नागपूरकरांना महा मेट्रो नागपूरचा प्रवास अनुभवता यावा, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जॉय राईडला नागरिकांतर्फे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तब्बल १० हजार नागरिकांनी जॉय राईडच्या माध्यमातून मेट्रोचा प्रवास अनुभवला होता. तसेच आता प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या अनुषंगाने देखील मोठय़ा प्रमाणात नागरिकांना मेट्रोचा प्रवास अनुभवता यावा, यासाठी ही सवलत महा मेट्रोतर्फे देण्यात येत आहे. सवलतीचे  दर  ठराविक कालावधीसाठी निर्धारित करण्यात आले असून मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन महा मेट्रोतर्फे करण्यात येत आहे.

क्र  स्थानक                        भाडे

खापरी ते एयरपोर्ट                १०

एयरपोर्ट ते सीताबर्डी            १०

खापरी ते बर्डी                        २०

लोक.नगर ते सुभाष नगर     १०

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maha metro proposed major discounted inaugural fares for commuters in nagpur
First published on: 23-02-2019 at 00:22 IST