मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

महापरीक्षा पोर्टलमधील तांत्रिक समस्यांमुळे विविध शासकीय पदाच्या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत पोर्टलमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील. तसेच ते अधिक अद्ययावत आणि सुविधापूर्ण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत दिले.

महाआयटीच्या माध्यमातून महापोर्टलद्वारे राज्य शासनाच्या विविध विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाते. त्यासाठी विषयतज्ज्ञ प्रश्नपत्रिका तयार करतात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राज्यातील वेगवेगळ्या ६७ केंद्रावर घेतली जाते. या प्रक्रियेसंदर्भात आलेल्या तक्रारीनंतर यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली.

आता पुन्हा एकदा चौकशी सुरू आहे. तसेच महापरीक्षा पोर्टलचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. या परीक्षणाच्या अहवालाच्या आधारावर महा ई परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येतील. परीक्षार्थीवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी राज्यशासन सतर्क असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पोर्टलच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह

पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेसाठी चार लाखांहून अधिक उमेदवारांची नोंदणी झाली होती. इतक्या जणांची परीक्षा घेण्याची पोर्टलची क्षमता नाही. त्यामुळे महापोर्टलची क्षमता वाढेपर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. परिषद सदस्य सतीश चव्हाण, गिरण पावसकर, हेमंत टकले, सतेज पाटील आदी सदस्यांनी लक्षवेधीदरम्यान हा विषय उपस्थित केला होता.