महाविकास आघाडी माघारली; भाजप नेत्यांचा दावा

नागपूर :  विदर्भात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले.  ३,९५६ ग्रामपंचायतींपैकी भाजपला  १,६२९ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळाले असून पक्षाच्या या यशात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे योगदान मोठे असल्याचा दावा भाजपने केला आहे.

विशेष म्हणजे, अनेक मंत्री या भागातील असूनही त्यांना महाविकास आघाडीला पुरेसे यश संपादित करून देता आले नाही. याउलट भाजपने ग्रामीण भागातील आपली पकड कायम ठेवली. भाजप नेते व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर तालुक्यात भाजपला लक्षणीय यश मिळाले. गोंदिया जिल्ह्य़ात १८१ पैकी ९५ ग्रां.प.मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. येथे माहाविकास आघाडीला ७८ जागा तर ८ जागांवर इतर उमेदवार विजयी झाले.

भंडारा जिल्ह्य़ात महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. जिल्ह्यातील १४८ पैकी ९५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. महविकास आघाडीला केवळ ५३ जागा मिळाल्या. वर्धा जिल्ह्यातही भाजपने मुसंडी मारली. या जिल्ह्य़ात ५० पैकी २९ ठिकाणी भाजपची एकहाती सत्ता आली आहे. काँग्रेसच्या हाती असलेल्या अनेक ग्रामपंचायतींत यावेळी मतदारांनी भाजपला कौल दिला आहे.  सेलू तालुक्यातील सर्वात मोठय़ा हिंगणी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भाजपचे आठ तर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत निघडे गटाचे सात उमेदवार  विजयी झालेत. येळाकेळी ग्रामपंचायतीवर भाजपचे १२ उमेदवार निवडून आले.

हिंगणघाट तालुक्यातील शिरूड ग्रामपंचायतमध्ये भाजपने ९ पैकी ६ जागा जिंकल्या आहेत. तीन जागांवर काँग्रेस विजयी झाली. आष्टी तालुक्यात पोरगव्हाण ग्रामपंचायतीत ६ जागांवर भाजप तर काँग्रेस तीन जागांवर विजयी झाली आहे.

जिल्हा  भाजपने जिंकलेल्या ग्रा.पं.

*   वर्धा – ५० पैकी २८

*   चंद्रपूर – ६२९ पैकी ३४४

*   गोंदिया – १८९ पैकी १०६

*   भंडारा – १४८ पैकी ९१

*   नागपूर – १३० पैकी ७३

*   वाशीम – १६३ पैकी ८३

*   अकोला – २२५ पैकी १२३

*   बुलढाणा – ५२७ पैकी २४९

*   अमरावती – ५५३ पैकी ११३

*   यवतमाळ – ९८० पैकी ४१९

(गडचिरोलीची मतमोजणी २२ जानेवारीला होणार आहे)

बावनकुळे, मुनगंटीवार यांचा करिष्मा कायम

भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रभावक्षेत्रात पक्षाला घवघवीत यश मिळवून  दिले. बावनकुळे यांच्या नेतृत्वात  कामठी तालुक्यात कोराडी व बहादुरा ग्रामपंचायतीत भाजपने निर्विवाद यश मिळवले. सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाच्या करिष्म्याने त्यांच्या बल्लारपूर मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्य़ात भाजपला लक्षणीय यश मिळाले.